"तुझे काॅल डिटेल्स लग्नात स्क्रीनवर दाखवीन..." विवाहित महिलेकडे खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:16 PM2023-02-07T16:16:10+5:302023-02-07T16:18:24+5:30
५० हजार आणि नंतर एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी...
पिंपरी : महिलेला फोन करून माझ्याकडे तुझा डाटा तसेच काॅल डिटेल्स रेकार्ड म्हणजे सीडीआर डाटा आहे. तो तुझ्या पतीला आणि त्याच्या नातलगांना लग्नात स्क्रीनवर दाखवून बदनामी करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना गुरुवारी (दि.२) ते रविवार (दि.५) या दरम्यान घडली वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने सोमवारी (दि.६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला फोन करणाऱ्या मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने फिर्यादींना त्यांचा सीडीआर डाटा त्याच्याकडे असल्याचे सांगत तो डाटा त्यांच्या पतीला आणि नातलगांना १० फेब्रुवारीला होणाऱ्या लग्नात स्क्रीनवर दाखवून बदनामीची धमकी दिली. तसेच पहिल्यांदा ५० हजार आणि नंतर एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.