पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त श्रावण हर्डीकर
By admin | Published: April 23, 2017 04:21 AM2017-04-23T04:21:05+5:302017-04-23T04:21:05+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली झाली असून, त्यांच्याजागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांची नियुक्ती करण्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली झाली असून, त्यांच्याजागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हर्डिकर हे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त असतील. पुढील आठवड्यात ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये वाघमारे यांचीदेखील बदली करण्यात आली. वाघमारे यांची २७ एप्रिल २०१६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान, आता महापालिकेची धुरा हर्डिकर सांभाळणार आहेत.
हर्डिकर हे २००५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
यवतमाळ येथे काम करीत असताना त्यांनी राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला नव्हता. काँगे्रसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा रोष ओढावून
घेतल्याने तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्डिकर यांची नागपूरला तडकाफडकी बदली
केली होती.
हर्डिकर यांना नागपूर महापालिकेत तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. हर्डिकर यांनी नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी केलेल्या कामगिरीची राज्य सरकारने दखल घेऊन कौतुक केले होते. त्यांनी नागपूरमध्ये विविध विकासकामे केली आहेत. (प्रतिनिधी)
- दिनेश वाघमारे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये कमी कालावधीत अनेक कामे करता आली. या कामांबाबत समाधानी आहे. येथे खूप काही शिकायला मिळाले.
- महापालिका स्थापन झाल्यापासून भाजपा प्रथमच सत्तेत आले आहे. वाघमारे यांच्या कालखंडातच हे सत्तांतर झाले आहे. आता नवीन सत्ताधाऱ्यांसह आयुक्तही नवीन असतील.