शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:56 AM2018-12-18T02:56:38+5:302018-12-18T02:57:19+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड पोलीस ठाण्यात ११ फेबु्रवारी २०१८ ला एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
पिंपरी : शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह वाकड पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या आरोपींकडून ३ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. राजू बाबूराव जावळकर (वय ५०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे), सोमनाथ सुभाष चौधरी (वय ३२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड पोलीस ठाण्यात ११ फेबु्रवारी २०१८ ला एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये छोटा टेम्पो (एमएच १२, एफडी ६४२३) चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील टेम्पो खेड शिवापूर येथे असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, एका शेडमध्ये हा टेम्पो आढळून आला. त्या वेळी हे दोन आरोपी हा टेम्पो गॅस कटरच्या साहाय्याने कापत असल्याचे दिसून आले. आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो रहाटणी, बीआरटी रोडवरून चोरी केल्याचे सांगितले.
अनेक गुन्हे उघडकीस
अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत असून, यातील राजू जवळकर याच्यावर पुणे शहर, सातारा, अहमदनगर येथे शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तर सोमनाथ चौधरी याच्यावर २० ते २५ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन यासह वाकड, इंदापूर, चाकण, तळेगाव दाभाडे, कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
वाहने केली जप्त
आरोपी वाहन चोरल्यानंतर ते सुरुवातीला निर्जनस्थळी नेऊन ठेवत. वाहनामध्ये जीपीएस यंत्रणा असल्यास वाहनमालक अथवा पोलीस त्या वाहनापर्यंत पोहोचण्याची वाट पाहायचे. दोन-तीन दिवसांत कोणीही त्या वाहनापर्यंत न पोहोचल्यास ते वाहन स्क्रॅप करण्यासाठी घेतले जात असे. दरम्यान, या आरोपींकडून रहाटणी येथून चोरलेला छोटा टेम्पो, क्रेन जप्त केली आहेत.