श्रीकर परदेशी यांनी घातलेय लक्ष
By admin | Published: July 4, 2017 03:56 AM2017-07-04T03:56:03+5:302017-07-04T03:56:03+5:30
अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यापासून ते महापालिका प्रशासनाला शिस्त लावून गेलेले महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यापासून ते महापालिका प्रशासनाला शिस्त लावून गेलेले महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडे महापालिकेतील आणि शहरातील गैरकारभाराची प्रकरणे त्यांच्याकडे धडकू लागली आहेत. परदेशी यांना शहरातील प्रश्नांची जाण असल्याने त्यांनीच जातीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा तक्रारदारांकडून व्यक्त होऊ लागल्याने परदेशी यांनी अशा प्रकरणांच्या चौकशीत लक्ष घातले आहे. लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यास दुजोरा दिला.
ठेकेदारांना झालेल्या कामाची बिले काढून देण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे तीन टक्के रकमेची मागणी करीत आहेत. मुख्य लेखापालांच्या माध्यमातून ही मागणी केली जात असली, तरी त्यामागे भाजपाचे दोन पदाधिकारी आणि स्थायी समितीच्या प्रमुख पदाधिकारी आहेत, अशी तक्रार प्रमोद साठे या कंत्राटदाराने ३ मे २०१७ ला पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर नोंदवली होती. त्याची दखल घेऊन पालिका आयुक्तांकडे खुलासा मागविला आहे.
सारथी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करून लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार कसा असावा, याचा आदर्श घालून देण्याचे काम परदेशी आयुक्त असतानाच्या काळात झाले. त्यांच्या पुढाकाराने सारथीची अंमलबजावणी झाली. त्याच महापालिकेत गैरकारभार,भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयात अशा तक्रारींची गंभीर दखल घेण्यास सुरूवात केली आहे.