शाळांमध्ये घुमला विठुनामाचा जयघोष

By admin | Published: July 4, 2017 03:48 AM2017-07-04T03:48:09+5:302017-07-04T03:48:09+5:30

पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसोबतच उद्योगनगरीतील शाळांमध्ये शिकत असलेल्या बालचमूंनाही

Shrine of Vitunama in schools | शाळांमध्ये घुमला विठुनामाचा जयघोष

शाळांमध्ये घुमला विठुनामाचा जयघोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसोबतच उद्योगनगरीतील शाळांमध्ये शिकत असलेल्या बालचमूंनाही लागली आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही, मात्र या वारीचा अनुभव मुलांना घेता यावा, यासाठी शहरातील बहुतांशी शाळांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या दिंडींमधून झाडे लावा झाडे जगवा, पाणीबचत अशा विविध विषयांवर घोषणा दिल्या जात होत्या. तर दुसरीकडे विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, ज्ञानेश्वरमहाराज, मुक्ताई यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. पारंपारिक वारीचे स्वरुप यावे यासाठी अनेकांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकही तल्लीन झाले. अनेक शाळांमध्ये कीर्तन, भारुड, वृक्षारोपण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. थोडक्यात पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस थोरांसोबत लहानग्यांमध्येही किती आहे, हे प्रकर्षाने पहायला मिळाले.

पिंपळे गुरव : दापोडीतील द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडिअम स्कूल व जुनी सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना संतांचे कार्य समजावे यासाठी विठूनामाचा गजर करण्यात आला.
दिंडीमध्ये पर्यावरणविषयी जागृती करण्यात आली. वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे वाचवा’, ‘वृक्ष हेच जीवन’ अशा घोषणा देत वृक्षांचे महत्त्व समजावून सांगितले. वारकरी पोशाख परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात ही वृक्षदिंडी काढण्यात आली. ६५० विद्यार्थ्यांनी नृत्य, अभंग, श्लोक, प्रवचन, पसायदान सादर केले. विजूअण्णा जगताप, शंकर जगताप, चंद्रकांत इंदुरे, डॉ. विकास पवार, प्रताप बामणे, मुख्याध्यापिका जयश्री माळी, सारिका गांगर्डे यांनी नियोजन केले.
जुनी सांगवी येथील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागात पार पडला. शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापिका जाधव प्रमिला यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक एकनाथ ढोरे हे पालखी सोहळ्यात उपस्थित होते. परिपाठात भजन-कीर्तन घेऊन ऊर्मिला शिरोडे यांनी वृक्षदिंडीचे महत्त्व सांगितले.
ढोल-ताशांच्या गजरात लेझीमच्या तालावर पालखी सोहळा मार्गस्थ झाला. संत वेशातील बालचमूंनी पालखीची शोभा वाढवली. विठ्ठल मंदिराजवळ पालखीचे रिंगण लेझीम पताका व टाळ यांच्या जयघोषात सजले. परिसरातील नागरिकांनी औषधी वनस्पतींचे उपयोग हस्तलिखित विद्यार्थ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. झिम्मा फुगडी निमित्ताने पालखीत नागरिकांनी सहभाग घेतला. वृक्षदिंडीनिमित्त वृक्षवाटप झाले. लेझीम पथकाला मार्गदर्शन मनीषा दरेकर यांनी केले.

पर्यावरणाचा संदेश
पिंपरी : लिटिल चॅम्प्स प्री-स्कूलमध्ये पालखी सोहळा पार पडला. या प्रसंगी बालचमूंनी साजेसा पोशाख परिधान केला होता. तसेच विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’ असे विविध संदेश परिसरातील लोकांना दिले. या वेळी संस्थेचे संस्थापक लक्ष्मण चोरघडे, अध्यक्ष अमोल चोरघडे, संचालिका कविता चोरघडे, स्नेहल सुर्डी, आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व समजावे यासाठी सोहळ्याचे आयोजन केले होते. वेळी शैलजा मोरे, सुशीला ढोंबरे, विजया टिळेकर, सुनीता माने, अपर्णा शिंदे, विद्या मराठे आदी उपस्थित होते.

Web Title: Shrine of Vitunama in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.