महापालिकेमध्ये शुकशुकाट, महाराष्ट्र बंदचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:46 AM2018-01-04T02:46:05+5:302018-01-04T02:46:21+5:30
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
पिंपरी - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. महापालिकेत शुकशुकाट होता. तर बुधवारी होणारी विविध विकासकामांची उद्घाटनेही रद्द करण्यात आली.
महाराष्टÑ बंदचा परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये जाणवला. पुणे-मुंबई महामार्गावर महापालिका भवन आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध सुरू असल्याचे समजल्याने नागरिकांनी महापालिकेत येणे टाळले. महापालिका क्षेत्रातील आठही प्रभागातील अधिकारीही प्रभागातच होते. तसेच नगरसदस्यांनीही महापालिका भवनात येण्याचे टाळले. तसेच परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते. त्यामुळे महापालिका भवनात होणारी नागरिक, नगरसेवक, अधिकारी यांची गर्दी आज दिसून आली नाही. प्रमुख अधिकाºयांचीही अनुपस्थिती दिसून आली. कोरेगाव भीमा येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांस श्रद्धांजली वाहून स्थायी समितीची साप्ताहिक सभाही तहकूब करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक दहामधील पिंपरी येथे उभारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटनाचे नियोजन केले होते. मोठ्याप्रमाणावर सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र, हा सोहळा साधेपणाने करण्यात आला. महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रम : बचत गट मेळावा स्थगित
दरम्यान चिंचवड के. एस. बी. चौकातील निगडी ते भोसरी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दुपारी तीनला होणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसेच दुपारी सव्वा तीनला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे महिला बचतगटांचा मेळावा स्थगित करण्यात आला. मात्र, स्मारकाजवळ शारदा मुंडे यांचा होय मी सावित्री बोलतेय... हा एकपात्री कार्यक्रम सादर झाला.
कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी शांतता राखावी. जातीय सलोखा राखावी. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व सोशल मीडियावर अफवा न पसरवता सर्वांनी शांत राहून संयम राखण्याचे आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.
- नितीन काळजे, महापौर