चिंचोलीतील आरोग्य केंद्र आजारी

By admin | Published: July 8, 2017 02:15 AM2017-07-08T02:15:25+5:302017-07-08T02:15:25+5:30

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने दोन वर्षांपूर्वी चिंचोलीत सुरू केलेले नागरी आरोग्य केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ डॉक्टर

The sick health center of Chincholi | चिंचोलीतील आरोग्य केंद्र आजारी

चिंचोलीतील आरोग्य केंद्र आजारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने दोन वर्षांपूर्वी चिंचोलीत सुरू केलेले नागरी आरोग्य केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सध्या पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने कॅन्टोन्मेंटच्या रुग्णालयातील एक डॉक्टर अल्प काळासाठी येत असले तरी दररोज वेगळे डॉक्टर, त्यांची वेळ जुळत नसल्याने चिंचोलीतील बहुतांशी रुग्णांनी आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून योग्य नियोजन होत नसल्याने चिंचोलीतील रुग्णांवर ही परिस्थिती ओढवली असल्याची बाब समोर येत आहे.
केंद्र सरकारच्या वतीने तत्कालीन मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यांनतर एक मे २०१३ पासून देशातील विविध शहरांत राहणाऱ्या जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेतून नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यानुसार बोर्डाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी शक्तावत यांच्या कार्यकाळात कॅन्टोन्मेंट बोर्डाने चिंचोलीत नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. नागरी आरोग्य केंद्राचा प्रस्तावास बोर्डाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मान्यता मिळाल्याचे पत्र बोर्डाकडे आले होते. तसेच राज्य सरकारच्या आदेशाने राज्यातील नागरी भागात एकाच दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी २०१५ आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या निर्णयानुसार बोर्ड प्रशासनाने चिंचोलीतील जिल्हा लोकल बोर्डाच्या काळातील जुन्या शाळेच्या इमारतीत आरोग्य केंद्राचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते़ मात्र, आरोग्य केंद्रात डॉक्टर व इतर कर्मचारी यांची नियुक्ती २२ जून २०१५ पासून करण्यात आली होती.
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित केंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सप्टेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते. त्याकरिता दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. केंद्राचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर १८ फेब्रुवारी २०१६ ला संबंधित आरोग्य केंद्र पुन्हा सुरूकरण्यात आले होते. त्यांनतर एप्रिल महिन्यात येथील डॉक्टरांनी मानधनाबाबत राज्य शासनाकडून एक परिपत्रक आले असून, त्यानुसार त्यांचे मानधन कमी करण्यात आल्याने त्यांनी राजीनामा सादर केला होता. त्यामुळे गेल्या वर्षी एक जूनपासून संबंधित डॉक्टर येत नसल्याने आरोग्य केंद्र बंद पडले होते. त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या डॉ़ नीलम चौधरी यांचा कार्यकाळ संपल्याने गेल्या दोन महिन्यांपासून चिंचोलीतील आरोग्य केंद्राला पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णांची गैरसोय होत असताना बोर्ड प्रशासनाने डॉक्टर नेमण्यास दिरंगाई केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून बोर्डाने योग्य नियोजन करून नियमानुसार एक पूर्णवेळ व एक अर्धवेळ डॉक्टर तातडीने नियुक्त करावेत, अशी मागणी केली आहे.

निधीचा अभाव : रुग्ण कल्याण समिती कागदावरच

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्याची सूचना दोन वर्षांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आली होती मात्र गेअद्यापही समिती स्थापनेकडे बोडार्चे दुर्लक्ष झाले आहे .त्यामुळे समितीसाठी निधी मिळण्यात अडथळा निर्माण झाला असून दरमहा पाच हजार रुपये मिळण्यास कॅन्टोन्मेंट बोर्ड मुकले असल्याची माहिती मिळाली आहे.

रुग्णांची सोय व्हावी म्हणून कॅन्टोन्मेंटकडून बोर्डाच्या रुग्णालयातील कोणतेही एक डॉक्टर काही वेळासाठी पाठविण्यात येत असले तरी पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने नियमित केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे सत्तर टक्क्यांनी घटली आहे.

Web Title: The sick health center of Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.