रविवारी आजारी पडाल, तर पस्तावाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2015 12:33 AM2015-12-21T00:33:10+5:302015-12-21T00:33:10+5:30
अत्यावश्यक सेवा असताना महापालिकेचे बहुतांश दवाखाने रविवारी बंद असल्याचे आढळले. सर्वसामान्य माणसांनी रविवारी आजारी पडू नये,
पिंपरी : अत्यावश्यक सेवा असताना महापालिकेचे बहुतांश दवाखाने रविवारी बंद असल्याचे आढळले. सर्वसामान्य माणसांनी रविवारी आजारी पडू नये, असा सल्लाच त्यातून दिला जात आहे, अशी उपरोधिक टीका होत आहे. दवाखाने बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे
चित्र रविवारी लोकमत टीमने केलेल्या पाहणीतून दिसून आले. अनेक गोरगरीब नागरिक दवाखाना बंद असल्याचे पाहून माघारी फिरत असल्याचे चित्र दिसले. हे दवाखाने रविवारी सुरू ठेवणे गरजेचे आहे. परंतु याकडे प्रशासन
लक्ष देत नाही. तर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे टीका होत आहे. सर्व दवाखाने रविवारी सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
वाल्हेकरवाडीतील दवाखान्याला सुटी
रावेत : रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वाल्हेकरवाडी येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दवाखाना चालविला जातो. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणची असणारी व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारे दवाखाने अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत. दररोज दवाखाने सुरू असणे अपेक्षित आहे. परंतु आज रविवारी दवाखाना बंद होता. परिसरातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय पहावयास मिळाली. रुग्णांना जिना चढून जाणे जिकिरीचे होते.
नेहरूनगरमध्ये नागरिकांची गैरसोय
नेहरूनगर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहरूनगर, विठ्ठलनगर ,बालाजीनगर, गवळीमाथा, यशवंतनगर आदी परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात. रविवारी हे केंद्र दिवसभर बंद असते. त्यामुळे रविवारी नागरिकांची गैरसोय होते. या केंद्रामध्ये एक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सहा कर्मचारी काम करीत असतात. या ठिकाणी नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. या केंद्राची सोमवार ते शुक्रवार वेळ सकाळी ८ ते ४ अशी असून, केस पेपर काढण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ आहे. केस पेपरसाठी १० रुपये दर आकारला जातो. हे केंद्र रविवारीदेखील सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
काळा खडक दवाखाना बंद
वाकड : वाकड,काळाखडक येथील बाह्य रुग्ण (ओपीडी) दवाखाना शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस बंद असल्याने गैरसोय होत आहे. येथील दोन झोपडपट्ट्या, वाढते गृहप्रकल्प आणि त्यावर काम करणारे मजूर या सर्वांमुळे येथील लोकसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णालय रविवारी बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, दवाखाना रविवारी देखील सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर असतात. त्यांची गैरसोय होत आहे.
बोपखेलमध्ये सुविधांचा अभाव
बोपखेल: बोपखेलमधील दवाखाना रविवारी बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.आरोग्य केंद्र आहे, तर त्याच्या सुविधांचा लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे आहे, असे गावातील नागरिकांचे सांगणे आहे. बोपखेलमधील महापालिकेच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार केले जातात. रक्त तपासणीसाठी भोसरी येथील पालिकेच्या दवाखान्यात जावे लागते. या तपासण्या बोपखेल मधील दवाखान्यातच केल्या जाव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.