तक्रार नसल्याची सही करा; अन्यथा धान्य नाही, रेशन दुकानदाराची मनमानी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:55 PM2018-11-14T22:55:52+5:302018-11-14T22:56:21+5:30
अधिकाऱ्यांकडून दुकानदाराची पाठराखण : सांगवीच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थींना धमकी
सांगवी : येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात बारामतीच्या तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. यावर स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थींच्या सह्या घेत ‘माझी काही तक्रार नाही अशी हमी द्या; अन्यथा धान्य मिळणार नाही,’ अशा धमक्या
देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या धान्य दुकानदाराची तहसीलदारांकडून झालेली चौकशी फक्त दिखावाच होता काय, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
स्वस्त धान्य दुकानदाराकडे धान्य आणण्यासाठी गेले असता, धमकी देऊन सह्या करण्यासाठी भाग पाडत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. मात्र, गोरगरिबांना लुबाडून मिळत असलेल्या मलईमुळे आपल्यावर कारवाई होऊ नये. आपल्या हातून एकही दुकान जाऊ नये, म्हणून या दुकानदाराने लाभार्थ्यांना आमच्या बाबत काहीही तक्रार नाही, म्हणून सही करा, अन्यथा तुम्हाला धान्य मिळणार नाही, अशी धमकी दिली जात आहे.
स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थींची अडवणूक केली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी पाहणाºया ग्रामस्थांनी बोलताना दिली. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी सुरूच आहे. तहसील कार्यालयाचे अधिकारीच दुकानदाराची पाठराखण करत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीबाबत तहसीलदार यांच्याकडून निर्णय अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वीच धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्यांकडून दबाव आणून सह्या कशासाठी घेत आहे, यामुळे तहसीलचे अधिकारी ते दक्षता कमिटीतील काही सदस्य या दुकानदारांची पाठराखण करत आहेत का, असादेखील सवाल उपस्थित
होत आहे.
दुकानदाराकडून या महिन्यात पहिल्यापेक्षा जादा धान्य वाटप
या अगोदर शिधापत्रिकेवर कमी प्रमाणात देत असलेल्या धान्यापेक्षा आता जास्त प्रमाणात धान्यदुकानदार धान्य देऊ लागला आहे. गेली कित्येक वर्षं लाभार्थींना आॅनलाइनची थापेबाजी ऐकवून कमी धान्य पुरवठा करत होता. मात्र, ग्रामस्थांनी तक्रार करताच, याच महिन्यात लाभार्थींना धान्य वाढवून देऊ लागला आहे.
यामुळे आजवर धान्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर करून गोरगरिबांचे धान्य लुबाडून खाल्ले असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता तरी झोपी गेलेले बारामती तहसील कार्यालयातील अधिकारी वर्ग झोपेतून जागे होऊन गैरव्यवहार केलेल्या स्वस्त धान्यदुकानदारावर कारवाईचा बडगा उचलणार का, असा सवाल लाभार्थी उपस्थित करू लागले आहेत.