मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट, दुष्काळाची शक्यता; तर जगायचे कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 04:13 PM2023-05-01T16:13:42+5:302023-05-01T16:13:59+5:30
पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता
शिवणे मावळ : उन्हाच्या झळा गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने मावळ तालुक्यातील धरणांच्यापाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडीवळे, कासारसाई, जाधववाडी ही शेती उद्योग व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.
पवना धरणात ३७.१७ टक्के पाणी
पवना धरण हे सर्वात मोठे असून त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ३७.१७ टक्के पाणी शिल्लक आहे.
आंद्रा धरणात ६१ टक्के साठा
आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या ६१ टक्के पाणीसाठा आहे.
वडीवळेत ३७.५१ टक्के साठा
नाणे मावळातील वडीवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्यावरील व नदीवरील पाणी कमी झाल्याने सध्या पाणी सोडणे बंद आहे. मागणीनुसार सिंचन, औद्योगिक व पिण्यासाठी पाणी सोडले जाते. सध्या धरणात ३७.२१ टक्के साठा आहे.
हवामान खात्याने वर्तविली दुष्काळाची शक्यता
आगामी काळात हवामान खात्याने दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मावळ तालुक्यात पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी केला जातो. धरणातून तालुक्यातील ५० ते ६० ग्रामपंचायतींना पाणी योजनेला पुरवठा केला जातो. त्यानंतर शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी दिले जाते.
पाणी जपून वापरा
वाढत्या उन्हामुळे व बाष्पीभवनामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. अन्यथा पावसाळा लांबल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
''गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीदेखील १५ जुलैपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. धरणातून दररोज ३२ दशलक्ष घटफूट पाणी सोडले जाते. - अशोक शेटे, उपविभागीय अभियंता, पवना धरण''