शंभर खड्डे चुकवत बसचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:15 PM2018-08-27T23:15:02+5:302018-08-27T23:15:25+5:30
किवळे-रावेत रस्ता : वाहनचालक, ग्रामस्थ त्रस्त; प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच
किवळे : किवळे ते रावेत दरम्यान बीआरटी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रावेत भागात रस्त्यावर १०५ खड्डे पडले असून, तीन ठिकाणी धोकादायक चर पडलेले आहेत. महापालिकेच्या संबंधित विविध विभागांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
किवळे ते सांगवी बीआरटी मार्गिकेच्या किवळे ते रावेत दरम्यानच्या बाहेरच्या रस्त्यावरून जात असताना बीआरटी मार्गासह इतर वाहनांसाठी वापरात असणाऱ्या शेजारच्या रस्त्याची विविध ठिकाणी दुरवस्था झाली आहे. मुकाई चौक ते भोंडवे वस्ती बसथांब्यादरम्यान वीसहून अधिक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. महावितरणने उन्हाळ्यात खोदकाम केल्यानंतर रस्ता दुरुस्ती व्यवस्थित न केल्याने विविध ठिकाणी पाणी साचून राहत आहे. रावेत भागात तर खोदलेल्या भागात लहान-मोठे अनेक खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी लांबपर्यंत चर तयार झाले आहेत. लक्ष्मीनगरकडे जाणाºया रस्त्याच्या चौकापासून रावेतगाव बसथांबा ते पम्पिंग स्टेशन चौकापर्यंत ८५ लहान-मोठे खड्डे आहेत. रावेत भागात तीन ठिकाणी आडवे चर निर्माण झाले असून, त्यात व खड्ड्यांत वाहने आदळून अपघात होत आहेत. पाणी साचल्याने खड्ड्यांच्या अंदाज येत नाही.
दरम्यान, रावेत परिसरातील तीन बसथांबे गेल्या एका महिन्याहून अधिक काळ अंधारात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांब्यावरील वीजपुरवठा बंद असल्याने आधुनिक स्वयंचलित दरवाजे सताड उघडे ठेवण्यात येत असून, त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
राडारोड्याचे ढीग : रबरी पट्ट्याही निघाल्या
रावेत गाव, तसेच पंपिंग स्टेशन बसथांब्याजवळच्या भागातील रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. भोंडवेवस्तीनजीक मुख्य रस्ता दोन ठिकाणी खचला असल्याने वाहने आदळतात. सिलेस्टाईल सिटी वळणावर रस्त्याच्या पदपथावर राडारोड्याचे ढीग पडले आहेत. या ठिकाणी उन्हाळ्यात केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात रस्त्यावर लावलेल्या रबरी पट्ट्या निघाल्या आहेत. पावसाळी गटार व्यवस्था असतानाही पावसाचे पाणी काही ठिकाणी गटारीत जात असल्याने पावसाळ्यात मुख्य रस्त्यालगत पाण्याची तळी साचत असल्याचे दिसून येत आहे.
रावेत गावाजवळ रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. शिंदे वस्तीकडे वळणाºया चौकातही रस्त्यावर व पदपथावर असलेल्या चेंबरजवळ मोठे खड्डे पडले आहेत. भोंडवे वस्ती भागातील पावसाळी गटाराचे चेंबरचे झाकण तुटले असून, अपघात होण्याची शक्यता आहे.