चिठ्ठीतून लागली सरपंचपदाची लॉटरी; ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:47 AM2019-03-14T02:47:28+5:302019-03-14T02:47:36+5:30
निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी गावकऱ्यांचा स्तुत्य निर्णय
वडगाव मावळ : निवडणूक म्हटले की मतदान, त्यावर होणारा खर्च आणि त्यातून निर्माण होणारे कटू प्रसंग ओघाने येतात. ते टाळण्यासाठी अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. शिलाटणे गावामध्ये सदस्यांची निवड बिनविरोध झाली. पण सरपंचपदासाठी पाच जण इच्छुक उमेदवार होते. त्यांच्यात एकमत होत नव्हते. अखेर तहसील कार्यालयाच्या बाहेर पाच सदस्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्या छोट्या मुलांला उचलण्यास सांगण्यात आले. या चिठ्ठीच्या माध्यमातून गुलाब अहिरे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली.
मावळ तालुक्यातील सात गावांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शिलाटणे आणि पुसाणे या गावांतील निवडणूक बिनविरोध झाली. शिलाटणेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार होते. चिठ्ठी टाकून सरपंच निवड पद्धतीत गुलाब विठ्ठल अहिरे हे सरपंच बनले. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे : प्रभाग १ : कांचन शरद भानुसघरे, माधुरी रामनाथ भानुसघरे, मनीषा दत्तात्रय भानुसघरे. प्रभाग २ : शरद भीमराव अहिरे, सोनाली सुशिला येवले, निर्मला बाळासाहेब भानुसघरे. प्रभाग ३ :रूपाली दत्तात्रय कोंडभर, अश्विनी मच्छिंद्र भानुसघरे, जनाबाई विनायक कोंडभर अशी आहेत.
मावळ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अमाप खर्च
करण्यात येतो. पण पुसाणे आणि शिलाटणे गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून नवा आदर्श ठेवला आहे.