‘त्या’ गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना; आर्मीमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 21:55 IST2022-01-08T21:55:19+5:302022-01-08T21:55:35+5:30
आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांना अटक केली. यात आर्मीमधील काही बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘त्या’ गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना; आर्मीमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांना अटक केली. यात आर्मीमधील काही बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या ‘एसआयटी’कडून तपास होणार आहे.
सतीश कुंडलिक डहाणे (वय ४०, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा, जि. अकोला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गजानन पुरुषोत्तम मिसाळ (वय २३, रा. भातकुली, जि. अमरावती) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली. आर्मी इंटेलिजन्सने याप्रकरणी तीन संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी सतीश डहाणे व श्रीराम कदम हे दोघेही सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. आरोपी अक्षय वानखेडे हा याप्रकरणात एजंट म्हणून काम करीत असल्याचे समोर आले. यात ‘आर्मी’मधील बड्या अधिकाऱ्यांचा समोवश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्मी इंटेलिजन्सच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या स्थापनेची सूचना केली. सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, अजय जोगदंड, डाॅ. संजय तुंगार, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक मिनीनाथ वरुडे यांचा या पथकात समावेश आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त घनवट यांनी दिली.
आरोपी कोरोना ‘पाॅझिटिव’
सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पाॅझिटिव आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची व इतर आरोपींचीही कोरोना तपासणी केली आहे.