चोर मचाये शोर! पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या सहा घटना; लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 03:24 PM2021-10-12T15:24:24+5:302021-10-12T15:31:20+5:30

चोरट्यांनी दागिने रोख रक्कम मोबाईल तसेच वाहन चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. ११) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

six incidents of theft pimpri chinchwad city stole millions rupees | चोर मचाये शोर! पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या सहा घटना; लाखोंचा ऐवज लंपास

चोर मचाये शोर! पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या सहा घटना; लाखोंचा ऐवज लंपास

Next

पिंपरी: शहरात चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. चोरट्यांनी दागिने रोख रक्कम मोबाईल तसेच वाहन चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. ११) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विवेक अनंतराव चिद्दरवार (वय ६१, रा. भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिलन (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉक्टर असून त्यांचा वॉचमन/कामगार असलेल्या आरोपी मिलनकडे फिर्यादीच्या बिल्डींगची रखवालीची जबाबदारी होती. मिलनने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून तीन तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, हातातील तीन घड्याळे, असा एकूण दोन लाख २८ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. गुरुवारी (दि. ७) रात्री १२ ते शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडेनऊच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. 

नितीन रामचंद्र कदम (वय ४९, रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे तीन तोळे ६.३९० ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरी करून नेले. चोरीचा हा प्रकार ५ ऑक्टोबरला घडला. 

लखन श्रीरंग सूर्यवंशी (वय २१, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राम मंडलिक (वय २२, रा. पिंपळे गुरव) व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना आरोपींनी घरात प्रवेश केला. घरातून ८० हजारांची रोकड, दोन मोबाईल, असा एकूण ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. ११) घडला.

दिलीप विश्वनाथ जाधव (वय ३५, रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी ३ ऑक्‍टोबरला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मोरवाडी चौकात लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. 

वेस्ली वर्गीस (वय १९, रा. वल्लभ नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचे मित्र रूमच्या दरवाजाची आतून कडी न लावता रूममध्ये झोपले. त्यावेळी चोरट्यांनी फिर्यादीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, अब्दुल्लाह उमर शेख बिस्मिल्लाह (वय १९) यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, अभिजेय बी. (वय २०) यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल, शालिम स्वरूपकुमार शिंदे यांचा ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण ६१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. १०) रात्री साडेअकरा ते सोमवारी (दि. ११) सकाळी आठच्या दरम्यान घडला. 

संचिता केशव मोरे (वय ३५, रा. सुदर्शन नगर चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची नजर चुकवून अज्ञात चोरटा त्यांच्या घरात घुसला. घरातून ८९ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. चोरीचा हा प्रकार शनिवार (दि. ९) ते सोमवार (दि. ११) या कालावधीत घडला.

Web Title: six incidents of theft pimpri chinchwad city stole millions rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.