शहरात स्वाइन फ्लूूने सहाजण दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 01:38 AM2018-09-11T01:38:25+5:302018-09-11T01:38:35+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने गेल्या चार दिवसांत तब्बल सहाजण दगावले आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने गेल्या चार दिवसांत तब्बल सहाजण दगावले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात सोमवारी एकाच दिवशी तब्बल ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत.
स्वाइन फ्लू या आजाराने शुक्रवारी भोसरीतील २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर शनिवारी वडगाव मावळ येथील ५३ वर्षीय व्यक्ती स्वाइन फ्लूमुळे दगावली. यासह रविवारी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये म्हाळुंगे येथील ३३ वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील ४५ वर्षीय महिला, तसेच चिंचवड येथील ४३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यासह सोमवारीदेखील रावेत येथील ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
१ जानेवारीपासून अद्यापपर्यंत ५ हजार २४१ जणांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये अद्यापपर्यंत एकूण ११० रुग्ण आढळले असून, २० जणांचा मृत्यू झाला आहे. मागील एक महिन्यापासून शहरात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरातून बाहेर पडू नये. जनसंपर्क टाळावा. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा. आरोग्यदायी आहार घ्यावा.