पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त; ५६ जणांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:16 PM2022-08-24T21:16:24+5:302022-08-24T21:16:34+5:30
मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, वॉकीटॉकी संच, चार्जर आणि रोख रक्कम असा भलामोठा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पोलीस भरती घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ५६ जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांना २२ ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना आणि बीड येथून अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, वॉकीटॉकी संच, चार्जर आणि रोख रक्कम असा भलामोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात ७२० जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली. ही प्रक्रिया जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होती. भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडून केला जात आहे. तपासात पोलिसांनी पूर्वी ५१ आरोपींना अटक केली. त्यातील २६ जण हे भरतीमध्ये उमेदवार होते. तसेच आणखी ७५ पेक्षा अधिकजण या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या ७५ आरोपींमधील १२ आरोपी भरती प्रक्रियेत एवढा घोटाळा करूनही नापास झालेले आहेत.
दरम्यान गुन्हे शाखा युनिट चारने चार पथके औरंगाबाद, जालना आणि बीड शहरात पाठवली. या पथकांनी ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय २९, रा. जालना), कार्तिक उर्फ वाल्मिक सदाशिव जारवाल (वय २३, रा. औरंगाबाद), अरुण विक्रम पवार (वय २६, रा. बीड) अर्जुन विष्णू देवकाते (वय २८, रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय २२, रा. बीड) यांना २२ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ७६ मोबाईल फोन, ६६ इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, २२ वॉकीटॉकी संच, ११ वॉकीटॉकी चार्जर, ११ लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले. याचबरोबर हे डिव्हाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्डस, कागदपत्रे देखील जप्त केली.
विविध शहरांतून २० पेक्षा जास्त कारवाई
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्या या कारवाईत पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. आजवर बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा विविध शहरांमधून २० पेक्षा अधिक कारवाई करून ५६ आरोपींना पिंपरी -चिंचवड पोलिसांनी अटक केली.