लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात सहा ‘सखी’ मतदान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:32 PM2019-04-02T14:32:40+5:302019-04-02T14:33:06+5:30
पिंपरी : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुका किंवा विधानसभा मतदारसंघनिहाय एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करण्यात आले आहे. मावळ ...
पिंपरी : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुका किंवा विधानसभा मतदारसंघनिहाय एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश असल्याने मावळमध्येमहिला व्यवसथापित सहा सखी मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.
निवडणूक प्रशासनात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. काही महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महिला अधिकारी सक्षमपणे पार पाडत आहेत. मतदान प्रक्रियेत महिलांनी सहभागी होत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगातर्फे सातत्याने जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी सखी बूथ ही संकल्पना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात एक सखी बूथ तयार करण्यात आले आहे. या केंद्रांवर बूथ लेव्हल अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच अन्य कर्मचारी म्हणून महिलांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे.
पिंपरी येथील महापालिकेचे विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्र क्रमांक ३०४ सखी बूथ असणार आहे. चिंचवड मतदारसंघात थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण महापालिका शाळा क्रमांक ६०/१, पहिला मजल्यावरील खोली क्रमांक १ मधील मतदान केंद्र क्रमांक १७८ सखी बूथ राहणार आहे. विधानसभेच्या मावळ मतदारसंघात कान्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोली क्रमांक १ मधील मतदान केंद्र क्रमांक ११७ सखी बूथ असणार आहे. कर्जत येथील आर. झेड. पी. प्राथमिक मराठी कन्या शाळेतील खोली क्रमांक १ मधील मतदान केंद्र क्रमांक १६६ सखी बूथ आहे. पनवेल येथील विखे पाटील शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३४४ आणि उरण मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २२९ सखी बूथ म्हणून तयार करण्यात आले आहे.
लोकसभेच्या मावळ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता व्दिवेदी यांनी याबाबत सांगितले,महिलांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त आहे, किंवा इतर मतदान केंद्रांपेक्षा ज्या केंद्रांवरील महिला मतदारांची टक्केवारी जास्त आहे, अशा केंद्रांवर महिला अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. जेणे करून जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे.