पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सहा विशेष पथके : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 11:01 AM2020-09-11T11:01:40+5:302020-09-11T11:01:52+5:30
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखविणार तसेच गुन्हेगारांना कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिली जाईल.
नारायण बडगुजर
पिंपरी : शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आयर्नमॅन, अल्ट्रामॅन कृष्ण प्रकाश यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारला असून, गुन्हेगारी व त्याचे स्वरूप आदीबाबत ते आढावा घेत आहेत. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानुसार त्यांनी कामाचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरुपात साधलेला संवाद...
प्रश्न : पिंपरी-चिंचवड हे नवनिर्मित शहर असून, येथे सराईतांच्या तुलनेत नवे गुन्हेगार समोर येत आहेत. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : अल्पावधीत नावारुपास आलेले देशातील हे औद्योगिक शहर आहे. आयटीपार्क, एमआयडीसीतील कर्मचारी व कामगार तसेच माथाडी कामगार येथे मोठ्या प्रमाणात आहेत. यात स्थलांतरीतांचा मोठा भरणा आहे. यात परदेशी नागरिकही आहेत. स्थलांतरामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तसेच इतर राज्यातील गुन्हेगार येथे आश्रयाला येतात. परिणामी येथील गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते.
प्रश्न : अवैध धंदे नाहीत, गुन्हेगारी नियंत्रणात आहे, असे सांगण्यात येते. मात्र तसे नाही. शहरातील गुन्हेगारी कोणत्या स्वरुपाची आहे, असे वाटते?
उत्तर : काही लोक सांगतात शहरात गुन्हेगारी वगैरे काही नाही. मात्र शहरात गुन्हेगारी आहे. २६ गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. जमिनींवरील अतिक्रमणाचे गुन्हे, माथाडीच्या नावाखाली धमकावणे, संघटित स्वरुपाचे गुन्हे येथे दिसून येतात. काही गटतट देखील आहेत. त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो.
प्रश्न : असे गुन्हेगार, गटतटापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी काय उपाययोजना करणार?
उत्तर : नागरिकांनी बिनदिक्कत पोलिसांची मदत घ्यावी. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी एक मध्यवर्ती पथक नियुक्त केले जाईल. तसेच प्रत्यक्ष मदतीसाठी पाच ते सहा पथके स्थापन केली जातील. हेल्पलाइनची जबाबदारी असलेल्या मध्यवर्ती पथकाकडून त्या पथकांना सूचना केली जाईल.
प्रश्न : गुन्हेगारी रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?
उत्तर : सध्या येथील माणसे समजून घेऊन गुन्हेगारीचा आढावा घेत आहे. विविध पथके स्थापन करण्याचे नियोजन असून, मूर्त स्वरुपात येण्यास पुरेसा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर अंमलबजावणी होईल. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखविणार. गुन्हेगारांना कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी विविध उपक्रम देखील राबविण्यात येतील.
प्रश्न : लॉकडाऊन शिथील होताच वाहनचोरीचे प्रकार वाढल्याचे दिसून येते. त्यातील मास्टरमार्इंडला पकडण्यात यश का येत नाही?
उत्तर : वाहनचोरीच्या काही गुन्ह्यांची उकल होत आहे. यात आंतराराज्य टोळी आहे का, किती टोळ्या सक्रिय आहेत, याचा आढावा घेतला जात आहे. तसेच आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडे त्याबाबत चौकशी केली जात आहे. मुळाशी जाऊन तपास करण्यासाठी वाहन चोरी प्रतिबंधक पथक नियुक्त केले जाईल.
प्रश्न : कोरोनाच्या काळात पोलिसांच्या फिटनेससाठी काय उपक्रम राबविणार?
उत्तर : आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार तज्ज्ञांकडून योगासने तसेच व्यायामाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणार. पट्रोलिंगसाठी सायकलच्या वापरावर भर देणार. त्यासाठी सायकलिंग व रनिंग करण्याबाबत सूचित केले जाईल. त्यावर ‘स्मार्ट’ पद्धतीने नजर ठेवली जाईल. ‘स्मार्ट वॉच’सारखे ‘फिटबिट’ हे फिटनेस ट्रेकर पोलिसांना दिले जाईल. त्यामुळे पोलिसांची आॅक्सिजन पातळी, मधुमेह, कॅलरीज, शरीराचे तापमान आदी बाबींची नोंद होईल.
प्रश्न : फिटनेस ट्रेकर ‘फिटबिट’चा फायदा काय होईल?
उत्तर : पोलिसांनी फिटबिट मनगटी घड्याळासारखे वापरायचे आहे. प्रत्येक फिटबिट आयुक्तालयातील डॅशबोर्डला कनेक्ट राहणार आहे. त्यामुळे पोलिसांचे शरीराचे तापमान, नाडीचे ठोके, कॅलरीज, मधुमेह, आॅक्सिजन पातळी याची माहिती डॅशबोर्डवरून मिळणार आहे. परिणामी कोणत्या पोलिसाला आरामाची गरज आहे, काय त्रास आहे, याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होईल. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, मार्गदर्शन करणे सोपे होईल.