पिंपरी-चिंचवडमध्येही गगनचुंबी इमारती
By Admin | Published: January 23, 2017 03:02 AM2017-01-23T03:02:23+5:302017-01-23T03:02:23+5:30
मुंबई-पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही उंचच उंच गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतींच्या
पिंपरी : मुंबई-पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही उंचच उंच गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतींच्या उंचीवर असलेली १०० मीटरची मर्यादा नवीन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रूल) काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे कितीही उंच इमारत आता उभारता येणार आहे.
डीसी रूलमध्ये करण्यात आलेली वाढीव एफएसआयची खैरात तसेच इमारतींच्या उंचीवरील काढून टाकण्यात आलेली मर्यादा यामुळे शहराची वाढ आडवी न होता उभी होणार आहे. मात्र शहरामध्ये ७० मीटरपेक्षा जास्त उंचीची इमारत बांधावयाची असल्यास समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे. उंच इमारत उभारण्यात येणार असल्याच्या ठिकाणी रस्त्याची रूंदी ३० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर इतर मुलभूत सुविधा, दोन जिने आदी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आवश्यक बाबींची तरतुद त्या ठिकाणी करावी लागणार आहे.
सरकारी समितीने सुपूर्त केल्यानंतर तब्बल वर्षभराचा विलंब करून राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा ५ जानेवारीला सादर केला, मात्र विकास नियंत्रण नियमावली राखून ठेवली. ती नुकतीच जाहीर करण्यात आली. महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीत सरकारने फारसा फरक केलेला नाही. शहरातील मेट्रो सारख्या नव्या प्रकल्पांचा विचार करून काही नवे नियम मात्र लागू केले आहेत. विशेषत: बांधकाम व्यावसायिकांना एफएसआय सारख्या सवलती व क्लिष्ट नियमातून सुटका दिल्यामुळे येत्या काळात शहरामध्ये परवडणाऱ्या घरे मोठ्या संख्येने तयार होतील असा या क्षेत्रातील जाणकारांचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)