ताथवडे येथील जनावरांची जोपासना करणाऱ्या क्षेत्रात वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:16 IST2018-05-16T16:15:44+5:302018-05-16T16:16:58+5:30
ताथवडे येथील राज्य शासनाच्या वळू माता प्रक्षेत्रात शेकडो वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ताथवडे येथील जनावरांची जोपासना करणाऱ्या क्षेत्रात वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली
पिंपरी-चिंचवड (वाकड) : संकरित जनावरांची निर्मिती करणाऱ्या ताथवडे येथील राज्य शासनाच्या वळू माता प्रक्षेत्रात शेकडो वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वृक्ष लागवड-संवर्धनासाठी शासकीय स्तरावर आटापिटा सुरू असताना ह्या निर्दयी वृक्षतोडीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हिंजवडीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सायकर यांनी लोकमतच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. ताथवडे बीआरटी रस्त्यालगत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील शेकडो एकरावर हे महाराष्ट्र पशू विकास मंडळ वळू माता प्रक्षेत्र आहे. संकरित गाई आणि वळुंची पैदास आणि संगोपन करण्याचे काम येथे केले जाते.
एका बाजूला पवना नदी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट हिरवीगर्द झाडी असा हा संपूर्ण परिसर जंगल सदृश्य आहे. शेकडो वर्षांपूर्वीची हजारो झाडे येथे आहेत. जनावरांच्या चाऱ्याची देखील येथेच निर्मिती केली जाते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून मशीनच्या सहाय्याने तब्बल शंभरहुन अधिक अंदाजे २०-३० वर्षांची जुनी मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. या वृक्षतोडीला परवानगी दिली कोणी ? ही वृक्षतोड करण्यामागे काय प्रयोजन ? वृक्षतोड झालेल्या ओंडक्यांचे पुढे काय केले जाते ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत येथील व्यवस्थापक शिवाजी विधाते यांना विचारले असता ते म्हणाले वृक्षतोडीच्या आम्ही विरोधात आहोत. जी बांधावरची तुटलेली झाडे होती तीच तोडण्यात आली आहेत तरीही काही चुकीचं घडलं असेल तर खात्रीशीर माहिती घेऊन दोषींवर आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. येथे तीन हजार पशूंची जोपासना केली जाणार आहे.
वृक्ष तोड अत्यंत चुकीची
शासन वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असताना त्यांच्याच जागेतच वृक्षतोड करून काहीजण मनमानी पद्धतीचा कारभार करीत आहे. त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी मी संबंधीत मंत्री महोदयांना पत्रव्यवहार करणार आहे. - दत्ता सायकर (सामाजिक कार्यकर्ते)