‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा
By Admin | Published: February 14, 2017 02:01 AM2017-02-14T02:01:18+5:302017-02-14T02:01:18+5:30
पंचक्रोशीतील श्रद्धास्थान वाकड-हिंजवडी गावाचे ग्रामदैवत म्हातोबारायाच्या चरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून
वाकड : पंचक्रोशीतील श्रद्धास्थान वाकड-हिंजवडी गावाचे ग्रामदैवत म्हातोबारायाच्या चरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मावळचे खासदार बारणे यांची सभा घेण्यात आली. यानंतर काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत अवघी वाकडकर जनता सहभागी झाली.
शिवसेनेचे उमेदवार अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, राहुल कलाटे, संतोष पवार यांच्या प्रचारार्थ वाकड गावठाण म्हातोबा मंदिर परिसरात घेण्यात प्रचार सभा घेण्यात आली. या वेळी बारणे म्हणाले, ‘‘२००७ ते २०१२ या पंचवार्षिकमध्ये राहुल यांच्या मातोश्री कमल कलाटे नगरसेविका असताना वाकडचा जो विकास झाला तो वाखाणण्यासारखा आहे. यापुढेही वाकड परिसराला प्रगतिपथावर नेण्याचे अव्याहतपणे प्रयत्न सुरू राहतील. शिवसेनेच्या पॅनलला बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख आणि उमेदवार राहुल कलाटे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पाच वर्षांत वाकड परिसर जेवढा विस्तारला त्या तुलनेत आरक्षणे अद्याप विकसित झाली नाहीत. वाढत्या नागरीकरणानुसार ही आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यावर आमचा भर राहील. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.
नागरी सुविधांची वानवा आहे, हे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्याकडे कृती आराखडा आहे. आयटीतील उच्चशिक्षितांचे वाकडला मोठे वास्तव्य आहे. मात्र येथे सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नाईलाजाने त्यांना अक्षरश: गुरा-ढोराप्रमाणे सहा आसनी रिक्षात कोंबले जाते. हे विदारक चित्र पाहून मन हेलावते.’’
सभेनंतर मंदिर परिसरातून खासदार बारणे यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीत वाकड, पुनावळे, ताथवडेतील ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते आणि महिलांनी लक्षणीय सहभाग घेतला. जनसमुदायातून ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा गर्जनांनी परिसर दुमदुमून गेला. भगवे झेंडे व धनुष्याने वाकडचे सर्व रस्ते भगवे झाले होते. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीत शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. (वार्ताहर)