वाकसई होणार ‘स्मार्ट व्हिलेज’
By admin | Published: April 29, 2017 04:09 AM2017-04-29T04:09:06+5:302017-04-29T04:09:06+5:30
मावळ तालुक्यात अल्पावधीत विकासकामांचा आलेख वाढविलेल्या वाकसई गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली आहे.
लोणावळा : मावळ तालुक्यात अल्पावधीत विकासकामांचा आलेख वाढविलेल्या वाकसई गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली आहे. अशी निवड झालेले वाकसई हे मावळातील एकमेव गाव आहे.
राज्य सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेसाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १३ गावांची निवड केली. याकरिता काही निकष ठरवत प्रत्येक तालुक्यातून तीन गावांची निवड करण्यात आली. त्या तीनमधून पडताळणी करून एक गाव निवडण्यात आले. वाकसई गावाला शंभरपैकी ७८ गुण मिळाल्याने गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली.
डोंगर उतारावर वसलेल्या वाकसई गावात प्रथमच महिला सरपंचपदाचा मान मिळालेल्या सोनाली जगताप, गावाच्या विकासासाठी अहोरात्र धावणारे उपसरपंच बाळासाहेब येवले, प्रशासकीय पातळीवर कसोशीने काम करणाऱ्या ग्रामसेविका निर्मला भुजबळ यांनी चार वर्षांपूर्वी विकास कामाचा आराखडा तयार करीत चार वर्षांत जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, ग्रामपंचायत निधी, आदिवासी विकास निधी, पंचायत समिती निधी आदींच्या माध्यमातून तब्बल चार कोटी रुपयांची ६४ विकासकामे केली. डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांसह गावात सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, घरोघरी पिण्याचे पाणी, एलईडी पथदिवे, गटारे, प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनीकरण, घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी, स्मशानभूमी व निवारा शेड, गावात मध्यवर्ती
ठिकाणी आठवडेबाजार, गाव शंभर टक्के हगणदरीमुक्त, केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविणे, जलयुक्त शिवार व पाणलोट विभागांतर्गत जलसंधारण कामे झाली आहेत.(वार्ताहर)