शाळांच्या मनमानीने मुस्कटदाबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:58 AM2018-04-23T04:58:04+5:302018-04-23T04:58:04+5:30
दप्तर, पॅडदेखील आवडीच्या छायाचित्र असलेलेच खरेदी करताना दिसून येत असत.
रहाटणी : शाळेचे निकाल जाहीर झाले की, लगबग सुरू होते, ती नवीन वर्गात प्रवेश घेण्याची व शालेय साहित्य खरेदीची. नवीन गणवेश, नवीन पुस्तक, दप्तर, कंपास, पॅड यासह वह्या खरेदी करीत असताना वह्यावर आपल्या आवडीचे छायाचित्र असलेल्या वह्याच खरेदी करीत असत. दप्तर, पॅडदेखील आवडीच्या छायाचित्र असलेलेच खरेदी करताना दिसून येत असत.
मात्र मागील काही वर्षांपासून सर्वच साहित्य शाळा प्रशासनाकडून म्हणाल त्या विके्रत्याकडूनच व तेही शाळेतूनच खरेदी करण्याच्या हट्टापायी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याच्या जुलमी अटीमुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची खंत पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे.
खरे तर शाळांनी शालेय साहित्य खरेदीची सक्ती करू नये. कारण खासगी शाळेत मिळणाऱ्या साहित्याच्या काही प्रमाणात कमी दरात बाजारात शालेय साहित्य मिळत आहेत. त्यामुळे पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
सध्या खासगी शाळेची खरेदी बाजारातून होत नसून त्या त्या शाळेतूनच होत असल्याने शाळा प्रशासन व साहित्य विक्रेते मालामाल होत आहेत. यातून शैक्षणिक संस्थाचालक मोठा पैसा कमवित आहेत. याला आळा बसला पाहिजे अशी पालकांची अपेक्षा आहे. खरे तर शासनाने यावर कठोर निर्बंध घातले पाहिजेत अशीच मागणी पालकांकडून होत आहे.
शहरातील मराठी शाळा व महापालिका शाळेतून ही खरेदी सक्तीची नाही. मात्र खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून ही सक्ती केली जात आहे. शाळेने ठरविलेला गणवेश, बूट, मोजे, दप्तर, वह्या या ठरावीक पुरवठादाराकडूनच घेण्याची सक्ती शाळेकडून करण्यात येत आहे. दप्तर व वह्यांवर शाळेचे नाव, लोगो प्रिंट करण्यात आल्याने याच वह्या वापरण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. काही शाळा तर पायमोज्यांवर देखील शाळेचे नाव लिहीत आहेत.
काही संस्थाकडून शाळेतच दुकाने थाटत आहेत. त्यामुळे नाईलाज असताना बाहेरगावी गेले, तरी त्या तारखेला पालकांना घरी परतावे लागत आहे. विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले नाही. आम्ही जबाबदार नाही, अशी तंबीच पालकांना शाळेकडून मिळत असल्याने पालक नाईलाजाने हे साहित्य खरेदी करीत आहेत. मात्र शाळेत साहित्याचे स्टॉल लागले. तरी संपूर्ण साहित्य मिळेलच याची खात्री देण्यात येत नाही.
ाात्र शाळेतूनच शालेय साहित्य खरेदीची सक्ती का, असा सवाल काही पालक उपस्थित करीत आहेत. शाळा प्रशासनाने तर आतापासूनच विद्यार्थ्यांना स्वेटरची नोंदणी करण्यास सांगितले जात आहे. तसेच काही शाळेत स्पोटर््स खेळ सक्तीचे केले जात आहेत. त्यासाठी आगाऊ रक्कम पालकांकडून वसूल केली जात आहे. मात्र शाळेच्या अभ्यासक्रमाशिवाय अशी सक्ती करू नये म्हणून पालक व शाळा प्रशासन यांच्यात अनेक वेळा तंटे वाढत आहेत.
शाळांमधून साहित्यविक्रीला बंदी हवी
दर वर्षी नवीन पुस्तक खरेदी करण्याचे बंधन काही शाळाचालक विद्यार्थ्यांना घालत आहेत. त्यामुळे नवीन पुस्तक खरेदी पालकांना करावीच लागत आहे. बंधनामुळे पुस्तक विके्रत्यांचा खप वाढत असून शाळा प्रशासन व विके्रते यांचा नफा वाढत आहे. त्यामुळेच नवीन पुस्तक खरेदीचा घाट घातला जात आहे. एखाद्या विद्यार्थ्याची पुस्तके वापरण्यायोग्य असतील, तर ते वापरण्यास काय हरकत आहे, असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत. कितीही चांगल्या परिस्थितीत पुस्तके असली, तरी शाळा प्रशासनाच्या बंधनामुळे खरेदी अटळ झाली असल्याने शासनाच्या संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शालेय साहित्य खरेदी शाळांमधून खरेदीला बंदी घालावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
शहरात १ एप्रिलपासून सीबीएसई माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा जूनमध्ये सुरू होतील. प्रवेशाच्या नावाखाली हजारो रुपयांचे डोनेशन घेतले जात आहे. १० हजार ते लाखापर्यंतचे डोनेशन पालकांकडून उकळले जात आहे. यावर शिक्षण मंडळाने अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत.