Women's Day Special: खाकी वर्दीतील 'स्मिता' गाजवते कुस्तीचा आखाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:29 PM2023-03-08T12:29:03+5:302023-03-08T15:16:13+5:30
जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभाग होत आपल्या देशाचे नेतृत्व करावे, अशी स्मिता यांची इच्छा
रोशन मोरे
पिंपरी : कुस्ती हे येऱ्यागबाळ्याचे काम नाय..असं हिंदकेसरी मारूती माने म्हंटले होते. ते काही खोटं नाही. अगदी लहानपणापासूनच पैलवान घडवला जातो. त्याला तसा आहार आणि त्याच्याकडून शारिरीक मेहनत करून घेतली जाते. महिला, मुली या क्षेत्रात तश्या दुर्लक्षीतच पण वयाच्या २४ व्या वर्षी कुस्तीच्या आखाड्यात उतरून एका महिला पोलिसाने खाकी वर्दीची स्मिता जपली. त्या महिला पोलिसाचे नाव स्मिता पाटील. स्मिता या सध्या पिंपरी-चिंचवडच्या सायबर शाखेत पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत.
स्मिता यांचे वडिल निवृत्त सैनिक. त्यांच्याच प्रोत्साहानामुळे त्या वयाच्या १८ व्या वर्षी त्या पोलीस दलात भरती झाल्या. स्मिता यांचे पती रणधीर माने हे देखील पोलीस दलात कार्यरत असून ते देखील कुस्तीपट्टू आहेत. त्यांनीच स्मिता यांना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहान दिले. त्यांना कुस्तीविषयक प्राथमिक धडे दिले. तर, पोलीस खात्यातील बाजीराव कळंत्रे यांनी देखील स्मिता यांना मार्गदर्शन केले. खेळाडू ज्या वयात परिपक्कव होतो त्या वयात कुस्तीचे धडे घेत अस्मिता यांनी आपल्या कुस्तीने दरारा निर्माण केला. २०१६ पासून स्मिता या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत कुस्ती या खेळात सहभागी होत आहेत. फक्त एक वर्ष अपवाद सोडले तर प्रत्येक वर्षी स्मिता यांनी पदकाची कमाई केली आहे. अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत भाग घेत त्यांनी दोन कांस्य तर, आर्म रेसलिंगमध्ये सुवर्ण पदाकाची कमाई केली आहे.
देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा
स्मिता यांचे सासरे रमेश माने हे नामांकित पैलवान. त्यांना राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर, स्मिता यांचे पती हे देखील कुस्तीपट्टू. सासरकडील हा वारसा स्मिता यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलला आहे. स्मिता यांना आर्म रेसलिंगमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यामुळे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभाग होत आपल्या देशाचे नेतृत्व करावे, अशी स्मिता यांची इच्छा आहे.
मी जेंव्हा स्पर्धेत सहभागी होण्यास सुरवात केली तेंव्हा मुली या खेळाकडे वळत नव्हत्या. मात्र, आता हे चित्र पूर्णपणे बदल आहेत. मोठ्या संख्येने मुली कुस्तीचे धडे गिरवत आहेत. करिअर म्हणून कुस्ती क्षेत्राकडे पाहत आहेत. त्याचा मला जास्त आनंद आहे. - स्मिता पाटील, कुस्तीपट्टू
स्मिता पाटील यांची कुस्ती स्पर्धेतील कामगिरी
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा (कुस्ती)
सन २०१६ (कांस्य)
सन २०१७ (रौप्य)
सन २०१८ ----
सन २०१९(सुवर्ण)
सन २०२३ सुवर्ण
अखिल भारतीय पोलीस क्रिडा स्पर्धा (कुस्ती)
सन २०१५ कांस्य
सन २०१७ कांस्य
सन २०२२ सुवर्ण (आर्म रेसलिंग)
पोलीस महासंचालक पदक 2022 मध्ये प्राप्त