लाखोंच्या फटाक्यांचा धूर; लग्न, वाढदिवसानिमित्त केली जाते आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:57 AM2018-03-20T02:57:15+5:302018-03-20T02:57:15+5:30
सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे.
रहाटणी : सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश लग्नसोहळे सायंकाळी होत असल्याने या प्रकारांत वाढ होत आहे. आनंद व्यक्त करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येत आहे. यातून ध्वनी आणि वायुप्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,गरोदर महिला यांना अनेक प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागत आहे; तसेच मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांचे तर वायू व ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश मंगल कार्यालये दाट नागरी वस्तीत आहेत. लग्न म्हटले की आतषबाजी असे समीकरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. आतषबाजीचे सर्वत्र जणू फॅड असल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र या आतषबाजीसाठी फटाके किती वाजवावेत याचे भान कोणालाही राहिलेले नाही. फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे हृदय रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
लग्नाच्या वरातीत आणि मंगलाष्टके पूर्ण होताच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. हजारो फटाक्यांच्या माळा व आकाशात झेपावणारे फटाके वाजविले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासह वायुप्रदूषणही होत आहे. ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांवर रुपये लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. या आनंदाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांमध्ये दम्यासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत. दम्याचा आजार असलेल्या जेष्ठांचे जगणे कठीण झाले आहे.
प्रदूषण रोखण्याचा देखावा
एका बाजूला शासन ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असल्याचा देखावा करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कुचकामी ठरली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचा आजार जडला आहे. वायुप्रदूषणमुक्तीचा नारा देणाºयाच अनेक राजकीय व्यक्ती आणि कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यातून फटाके वाजविण्यात येतात.
‘भाऊ’, ‘दादां’चा वाढदिवस
शहरातील प्रत्येक घरात राजकीय पक्षांनी प्रवेश मिळविला आहे. घराघरांपर्यंत पोचलेल्या या राजकीय पक्षांमुळे शहरातील गल्ली-बोळातही ‘भाऊ’, ‘दादा’ तयार झाले आहेत. अशा ‘भाऊ’ आणि ‘दादां’ना स्वत:चा वाढदिवस दिमाखात साजरा करण्याची हौस असते. या हौसेपोटी मध्यरात्री फटाके वाजविण्यात येतात. मोठी आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे गल्ली बोळातील या ‘भाऊ’ आणि ‘दादां’च्या वाढदिवसाच्या आतषबाजीचा शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
विद्यार्थ्यांना नाहक त्रास
सध्या परीक्षांचा कालावधी आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असतात. अशा विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगल कार्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
मंगल कार्यालयांवर कारवाईची गरज
फटाके वाजविणे आणि आतषबाजी याबाबत नियमावली आवश्यक आहे. मंगल कार्यालय आणि परिसरात फटाके वाजविणे आणि आतषबाजीला निर्बंध आवश्यक आहेत. अतिप्रमाणात फटाके वाजविण्यात येणाºया मंगल कार्यालय मालक आणि चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.