चाैदाचाकी ट्रेलरमधून करत हाेते मद्याची तस्करी ; उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 04:37 PM2019-12-22T16:37:36+5:302019-12-22T16:44:44+5:30
गाेव्याहून चाैदा चाकी ट्रेलरमधून दारुची तस्करी केली जात हाेती. मावळ जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करत साठा केला जप्त
मावळ : मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची वाहतुक होणार असल्याचे खबऱ्या मार्फत माहिती मिळताच कुसगाव पथकर नाक्यावर सापळा रचत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला असुन याप्रकरणी सदाशिव जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खबऱ्याकडून गोव्यातून विदेशी मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत जुना पुणे मुंबई महामार्गावरील कुसगाव पथकर वसुली नाकावर चौदा चाकी ट्रेलर (क्र. एम एच ४६ एच ३५३४) हा तपासणी साठी थांबवला असता ट्रेलर चालक व क्लीनरने कंटेनर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असल्याची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने कंटेनरची दारूबंदी कायद्या अंतर्गत झडती घेण्यात आली. यावेळी ७५० मिली क्षमतेच्या एका बॉक्स मध्ये १२ बाटल्या असलेले १२०० बॉक्स व १८० मिली क्षमतेच्या एका बॉक्स मध्ये ४८ बाटल्या ८०० बॉक्स असे एकूण २००० बॉक्स झडतीमध्ये जप्त करण्यात आले. याप्रकरणी ट्रेलर चालक राजेश रत्नाकरन कुरुवाट ( वय २८ रा. कोलमपारा कुरीक्कावल्लापील, मु. कीझमाला पो. करिडालम जि. कासारागोड, केरळ) व क्लिनर विजित श्रीधरन कानीकुलथ ( वय २८ रा. ४/१९८ – ए, मदाथिल, मु. कुडोल पो. बिरीकुलम, पाराप्पा रोड, जि. कासारागोड, केरळ) यांना अटक केली आहे.
या गुन्ह्याशी संबंधित वाहनमालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्यखरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेले अन्य इसमांना फरार घोषित करण्यात आले असुन एकूण 1 कराेड 46 लाख 81 हजारांचा किमतीचा मुद्देमाल ट्रेलरसह जप्त केला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये सात लाखाहून अधिक किंमतीचा मद्य साठा एका चारचाकीतून जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राज्यउत्पादन शुल्क, आयुक्त प्राजक्ता वर्मा - लवंगारे, संचालक उषा वर्मा यांच्या आदेशानुसार व उपविभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दिपक परब, प्रसाद सास्तुरकर दुयम्म निरीक्षक प्रमोद कांबळे, सदशिव जाधव, सुरेश शेगर यांनी कारवाई केली. यावेळी राज्यउत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक राजाराम खोत दुयम्म निरीशक नरेंद्र होलमुखे व जवान वर्ग यांची मदत घेण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास दिपक परब करत आहे.