पिंपरीतील क्रीडा विभागाच्या कार्यालयात आढळला साप, कर्मचाऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:10 PM2018-03-08T14:10:36+5:302018-03-08T14:10:36+5:30
क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्रात गुरूवारी सकाळी कार्यालयात घोणस जातीचा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
पिंपरी : नेहरूनगरजवळील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्रात गुरूवारी सकाळी कार्यालयात घोणस जातीचा साप आढळल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तसेच कागदपत्रांचा ढिगारा, कार्यालयातील वस्तुंची अडचण त्यामुळे सापाचा शोध घेणे अवघड जात होते. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले त्याने घोणस जातीचा साप पकडला.
गुरुवारी सकाळी खिडकीतून एक साप बाहेर आल्याचे रखवालदाराने पाहिले होते, त्याने फुस्स फुस्स आवाज सापाचा असल्याचे सांगितले. सकाळी कामावर आलेले कर्मचारी कोणीही कार्यालयात जाऊन बसण्याचे धाडस करेना.घोणस जातीच्या सापाने पिल्ले दिली असल्याची शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली.सापाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. काही कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने कोठे साप दिसतो आहे, का हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार असल्याने त्यांना काही दिसत नव्हते, आवाज मात्र ऐकू येत होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना बोलावले, त्यांनी साप पकडला . त्यानंतर दुपारी १२ वाजता कर्मचारी आपापल्या खुर्चीत बसले. घोणस जातीचा साप सर्पमित्र राहुल यांनी प्रशांत काळे, सतिश सुर्यवंशी यांच्या मदतीने पकडला. घोणसने पिल्ले दिली असल्याची शक्यता आहे. घोणस एका वेळी किमान चार ते पाच अथवा त्यापेक्षा अधिक पिल्लांना जन्म देऊ शकते. त्यामुळे घोणस या विषारी जातीच्या सापाची आणखी पिल्ले असू शकतात. अशी शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली असून क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.