मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना सोशल मीडियाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 06:26 AM2017-10-29T06:26:15+5:302017-10-29T06:26:34+5:30

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगण्यामुळे अल्पवयातच नैराश्य घेरू लागले आहे. नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक

Social media base for those suffering from depression | मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना सोशल मीडियाचा आधार

मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना सोशल मीडियाचा आधार

Next

पिंपरी : सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगण्यामुळे अल्पवयातच नैराश्य घेरू लागले आहे. नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या असोत; त्यांच्याशी दोन हात करण्यापेक्षा आपले जीवन संपवणे अधिक सोपे वाटू लागले आहे. नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेल्यांशी वेळीच संवाद साधला गेला आणि त्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले तर अनेकांचं जगणं पुन्हा सुंदरतेकडे वळू शकेल. नेमका हाच विचार घेऊन सध्या ‘नेटकरी’ मंडळींनी फेसबुकद्वारे आश्वासक आधार द्यायला सुरुवात केली आहे.
आत्महत्या प्रतिबंध जागरूकता, तुम्ही एकाकी नाही, तुमच्याबद्दल मला आस्था आहे. अशा ‘हॅश टॅग’सह फेसबुकवरुन नैराश्यग्रस्तांना प्रेमाचा हात देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आलेला आहे. सोशल मीडियाद्वारे चांगला असो अथवा वाईट असो कोणताही संदेश काही क्षणांतच सर्वदूर पोचवणे सोपे झाले आहे. जगभरामध्ये आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानसिक आरोग्य जागरुकता सप्ताह पाळला जातो. अमेरिकेच्या संसदेने ठराव करुन १९९0 साली या सप्ताहाला सुरुवात केली. अमेरिकेतील ‘नॅशनल अलायन्स आॅन मेंटल इलनेस’ या संस्थेने मानसिक रुग्णांबाबत समाज शिक्षण आणि बदलासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. भारतामध्येही विविध राज्यांमध्ये हा सप्ताह पाळला जातो.
अलीकडच्या काळात मानसिक आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच नैराश्य येण्याच्या प्रमाणातही कमालिची वाढ होत चालली आहे. मानसिक औदासीन्य वाढण्यासाठी आसपासची परिस्थिती कारणीभूत ठरत असली तरी एकमेकांमधला संवाद, समजूतदारपणा, सहनशीलता आणि संवेदनशीलता कमी होत चालली आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार, २०२० साली औदासीन्याचा दबाव पूर्ण जगात दुसºया क्रमांकावर असेल. विकसित आणि विकसनशील देशांच्या उपचाराक्षमतेपेक्षाही रुग्णांची संख्या अधिक होण्याची भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केलेली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. मानसिक औदासीन्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार उद्भवू शकतात. संवादाच्या अभावामधून या घटना वाढत चालल्या आहेत. खरोखरीच जर अशा नैराश्याने घेरलेल्या व्यक्तींशी संवाद साधला गेला, त्यांना प्रेमाचा आणि आपुलकीचा स्पर्श झाला तर कदाचित त्यांना जीवन संपविण्यापासून वाचविण्यात यश येऊ शकेल.

काय आहे मेसेज
‘माझ्या घराचे दार उघडे आहे. घर सुरक्षित आहे. काही क्षणात तुम्हाला चहा, कॉफी मिळेल. स्वयंपाकघराच्या ओट्याचे कोणतेही पूर्वग्रह नाहीत, तिथे शांती नांदते. ज्याला कोणाला बोलायचंय त्याच्याशी गप्पा मारायला मी सदैव तयार आहे. एकेकटे सोसत बसू नका. घरात अन्न, चहापाणी आहे, तुमचं ऐकून घ्यायला उत्सुक कान आहेत. रडायला खांदा आहे. तुमचं माझ्या घरात स्वागत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात या काही जुन्या गोष्टी आपण विसरत आहोत. फक्त एखादा एसएमएस, इमोजी किंवा व्हिडीओ चॅट आपल्या जिवलगांना वेळ देण्यासाठी, काळजी घेण्यासाठी पुरेसा नाही! किमान एक मित्र, मैत्रीण हे कॉपी करून स्वत:च्या वॉलवर रिपोस्ट करेल का? कृपया नुसते शेअर करू नका. जगात तुम्ही कधीही खरोखर एकाकी नाही हा संदेश पोहोचायला हवा.’

फेसबुकवर मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताहानिमित्त हा मेसेज आमच्या वाचनात आला. अलीकडच्या काळात महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. महिलांसाठी आम्ही सुरु केलेल्या ‘मैत्र’ व्यासपीठावरुन याबाबत सतत संवाद साधला जात आहे. मैत्रच्या फेसबुक पेजसह सर्व सभासद महिलांनी स्वत:च्या पेजवर हा मेसेज कॉपी पेस्ट केला आहे. तसे आवाहन आम्ही केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून संवादामधून अनेकांना आपण मानसिक, भावनिक आधार देऊ शकू असे वाटते.
- मेधा पुरकर, संचालिका, मैत्र
 

Web Title: Social media base for those suffering from depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.