माणुसकीचा झरा हरवतोय, सोशल मीडियाचा परिणाम, मदतीपेक्षा जखमींची छायाचित्रेच व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:41 AM2017-09-24T04:41:04+5:302017-09-24T04:41:41+5:30
एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघातस्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात.
पिंपरी : एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघातस्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात. अपघातात ठोकर देणारे आणि एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या वाहनाचा तपशील मात्र कोणाकडे मिळत नाही.
अपघात स्थळावर गर्दी करून अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळवून देण्याऐवजी तेथील जखमींची छायाचित्रे काढून मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर ती पाठविण्याची अनेक जण घाई करतात. चिंचवडला विद्युत डीपीतून इंधन गळती होऊन गटई कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्या वेळी काहींनी आगीत होरपळून निघणाºया गटई कामगाराचे मोबाइलवर छायाचित्रण केले. परंतु गटई कामगाराला वाचविण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. मागील वर्षी घडलेली ही घटना बघ्यांच्या गर्दीत माणुसकी हरविल्याचे सूचित करणारी ठरली असताना, महिनाभरापूर्वी भोसरीत अशीच घटना घडली. अपघातात जखमी होऊन पडलेल्या एका जखमी व्यक्तीचे मोबाईलवर छायाचित्र घेण्यास सरसावणारे अनेक जण होते. परंतु त्यांच्यापैकी कोणी मदतीला धावून आले नाही. या मार्गाने जाणाºया एका डॉक्टरने थांबून जखमीला मदत केली. मोबाइलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णवाहिका, पोलीस यांचीही मदत तातडीने मिळविणे शक्य असते.
अपघाताच्या अनेक घटनांमध्ये प्रामुख्याने अपघातात एखाद्याचा मृत्यू होतो, अशा वेळी ठोकर देऊन गेलेले वाहन अज्ञात असल्याची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतात. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी होते, त्या वेळी अनेक जण मोबाइलमध्ये छायाचित्र घेत असतात. त्या वेळी अपघातातील वाहनांचे अपघात स्थळावरील वाहन क्रमांक सुस्पष्ट दिसेल असे छायाचित्र व्हारल झाल्यास पोलिसांना संबंधित वाहनचालकावर कारवाई करणे भाग पडेल. अज्ञात वाहनचालक म्हणून कारवाईतून त्याची सुटका होणार नाही. शिवाय विमा योजनेचे काही लाभ अपघातग्रस्तांना मिळणार असतील, तर ते लाभसुद्धा घेता येतील.
आरटीओ : वाहनचालकाची माहिती देणारे अॅप
अपघातस्थळावरील वाहनांचा क्रमांक मोबाइलवर उपलब्ध असलेल्या वाहतूक विभागाच्या अॅपमध्ये टाकल्यास काही क्षणात त्या वाहनाची मालकी, आरटीओ नोंदणी आणि अन्य तपशील मोबाइलच्या स्क्रिनवर उपलब्ध होतो. या अॅपविषयी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. अपघातातील वाहनांची छायाचित्र आणि माहिती नागरिकांकडून पोलिसांना वेळीच मिळाली तर त्या वाहन चालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. चांगल्या अर्थाने स्मार्ट फोनचा आणि सोशल मीडियाचा उपयोग अशा पद्धतीने होऊ शकतो. केवळ जखमींची छायाचित्र व्हॉट्सअॅपवर टाकण्यापेक्षा जखमींच्या, दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठीही त्याचा उपयोग व्हावा, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.