समाजमंदिराचे भाडे रुपया
By admin | Published: December 17, 2014 05:24 AM2014-12-17T05:24:33+5:302014-12-17T05:24:33+5:30
महापालिकेची जागा वाटपाची स्वतंत्र नियमावली असतानाही, या नियमावलीला छेद देत तळजाई झोपडपट्टी येथे बांधलेले दोन मजली समाज मंदिर अवघ्या एक रूपया भाडे
पुणे : महापालिकेची जागा वाटपाची स्वतंत्र नियमावली असतानाही, या नियमावलीला छेद देत तळजाई झोपडपट्टी येथे बांधलेले दोन मजली समाज मंदिर अवघ्या एक रूपया भाडे दराने २९ वर्षासाठी देण्याचा करार करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
देण्यात आली. ही जागा देण्यासाठी २००० साली महापालिकेने संबधित संस्थेस जागा वापरासाठी करार करण्याच्या सूचना दिल्याच्या
पत्राचा आधार घेऊन जागा
वाटपाची नियमावलीच धाब्यावर बसविण्यात आली आहे. सभागृह नेते सुभाष जगताप यांनी हा प्रस्ताव ठेवला होता.
महापालिकेच्या जागा वाटपांचे धोरण ठरविण्यासाठी २००८ मध्ये महापालिका प्रशासनाने स्वतंत्र नियमावली तयार केलेली आहे. त्यास राज्यशासनाने मान्यताही दिलेली आहे. या नियमावलीनुसार, २००८ नंतर महापालिकेची कोणतीही जागा देताना अथवा जुन्या जागांच्या करारांचे नुतनीकरण करताना चालू वर्षाच्या रेडीरेकनुसार भाडे आकारून आणि निविदा काढूनच देण्याची तरतूद या नियमावलीत आहे.
या नियमावलीनुसारच पालिकेकडून जागांचे वाटप केले जाते. मात्र, असे असतानाही, तळजाई झोपडपटटी येथे बांधण्यात आलेले समाज मंदीर कै. सुमन जगताप चँरीटेबल ट्रस्ट या संस्थेला २९ वर्षाच्या कराराने वार्षिक 1 रूपया दर आकारून करार करण़्याचा प्रस्ताव सभागृह नेते सुभाष जगताप यांनी दिला होता. त्यासाठी २००० मध्ये नागरवस्ती विभागाने जागा देऊ केलेल्या पत्राचा आधार घेण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ही जागा देताना, त्याची निविदा प्रक्रीया आणि रेडीरेकनरनुसार, भाडे घेणे अपेक्षीत आहे. मात्र, असे असतानाही स्थायी समितीत एकमताने ही जागा जगताप ट्रस्टला देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)