क्षुल्लक कारणावरून आईच्या डोक्यात घातली सिलिंडरची टाकी, माळवाडीमध्ये मुलाने केला आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 06:47 AM2018-03-01T06:47:30+5:302018-03-01T06:47:30+5:30
ही धक्कादायक घटना तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील येथून जवळच असलेल्या माळवडी (ता.मावळ) येथे...
तळेगाव दाभाडे : विक्षिप्त मुलाने क्षुल्लक कारणावरून आईच्या डोक्यात लोखंडी गॅस सिलिंडरची टाकी घालून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील येथून जवळच असलेल्या माळवडी (ता.मावळ) येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
मीना बाळासाहेब दाभाडे (वय ५५, शितळादेवी मंदिर शेजारी ,माळवाडी ता.मावळ, जि. पुणे)असे दुर्दैवी जन्मदात्रीचे नाव आहे. राम बाळासाहेब दाभाडे (वय २७) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या संदर्भात मयत मीना यांचे दीर शांताराम सीताराम दाभाडे (वय ६५, माळवाडी शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील,पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले,विक्रम पासलकर यांनी भेट दिली. माडगूळकर यांनी तपास कामी महत्त्वाच्या सूचना दिल्या.आरोपी राम दाभाडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या या घटनेमुळे आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लागला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम दाभाडे हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर येरवडा येथे उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. किरकोळ भांडणाचा राग मनात धरल्याने मुलाकडून हे दुष्कृत्य घडले.
घरात आई मीना आणि मुलगा राम असे दोघेच होते.तो विक्षिप्त असल्याने घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन त्याने आई मीना हिच्या डोक्यात लोखंडी गॅस सिलिंडरची टाकी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मीना यांना पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अमानुष घटनेमुळे माळवाडी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.