डीजेच्या आवाजाचा नागरिकांना त्रास
By Admin | Published: December 23, 2016 12:32 AM2016-12-23T00:32:34+5:302016-12-23T00:32:34+5:30
लग्न समारंभामध्ये कोणत्याही परवानगीविना सांगवी परिसरात डीजे वाजवत आहे, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.
नवी सांगवी : लग्न समारंभामध्ये कोणत्याही परवानगीविना सांगवी परिसरात डीजे वाजवत आहे, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. सांगवी परिसरात आणि बहुतेक सर्व ठिकाणी लग्न समारंभ कार्यक्रम दिसून येत असून, पारंपरिक बँड आणि वाजंत्रीची जागा डीजेने घेतली असून, आनंद आणि सुमधुर आवाजापेक्षा कर्णकर्कश आवाजाने लग्न समारंभ उत्साहात संपन्न होताना दिसत असून, कोणाला काय त्रास होईल, याला महत्त्व न देता डीजेचे फॅड सर्वदूर वाढलेले आहे. सांगवी परिसरातील अनेक मंगल कार्यालयांत आणि घरोघरी लग्न समारंभ होताना दिसत असून, या कार्यक्रमात डीजे लावून नाचण्याची पद्धत आहे. सांगवी परिसरात अनेक ठिकाणी मंगल कार्यालये असून, रहिवासी क्षेत्र आणि दवाखान्याजवळ ४१ कार्यालये असून, त्याचा त्रास तेथील रुग्ण आणि सामान्य जनतेला होत आहे. परिसरातील अनेक शाळा पण या भागात असल्याने मोठ्याने वाजणाऱ्या डीजेला परवानगी देऊ नये, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. मंगल कार्यालय मालकही या गोष्टी लक्षात न घेता कसलीही सूचना न देता पैशाच्या लालसेने याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. तरी पोलीस प्रशासन अशा गोष्टी कोणत्या पद्धतीने हाताळतात हा जनतेचा सवाल असून, कारवाई होऊन बंदी आणावी, अशी मागणी आहे.(वार्ताहर)