पिंपरीत महावितरणच्या रोहित्रातून ठिणग्या उडून विद्युत स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:48 PM2021-08-26T12:48:24+5:302021-08-26T13:03:49+5:30
रावेत येथील नॅनो होम्स सोसायटीच्या नजीक असणा-या विद्युत खांबावरून उडत होत्या ठिणग्या
पिंपरी : रावेत येथील नॅनो होम्स सोसायटीच्या नजीक असणा-या विद्युत खांबाववरील तारांची सकाळी नऊच्या व संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ठिणग्या उडाल्याने नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित्रातून ठिणग्या उडाल्याने घरांना आगी लागण्याचे आणि त्यातून जखमी होण्याचे प्रकारही शहरात अनेकदा घडले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरांत यापूर्वीही नागरिकांचा नाहक बळी गेल्याच्या अशा घटना घडल्या आहेत. जुनाट यंत्रणा आणि महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गलथानपणा त्यातून वेळोवेळी समोर आला असतानाही त्याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने शहरातील विद्युत पोल नागरिकांसाठी छुपे बॉम्ब ठरत आहेत.
कर्मचारी नॉटरिचेबल तर अधिकारी स्टेबल
आयटीयन्सचे हब म्हणून रावेतची ओळख आहे. टोलेजंग इमारतीमुळे या परिसरात नोकरदार वर्ग घर घेण्यास प्राधान्य देतात. मात्र. वारंवार वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे आयटीयन्सच्या कामात अडचणी ठरत आहेत. या परिसरात विजेची समस्या झाली तर नागरिक महावितरणला तक्रार करण्यासाठी महावितरणच्या कर्मचा-यांना व अधिका-यांना फोन केला असता त्याच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही. बिल भरूनही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने महावितरणचे अभियंता मनोज पुरोहित यांना फोन केला असता त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तर कार्यकारी अभियंता एम.डी. चौधरी यांच्याकडे विचारपूस केली असता. याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
वीज यंत्रणांजवळील अतिक्रमणेही कारणीभूत
शहरातील रोहित्र किंवा इतर वीज यंत्रणेच्या परिसरात होणारी अतिक्रमणेही अनेकदा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीच्या प्रक्रियेत अडथळा ठरत असल्याचे मत काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वीज यंत्रणेजवळील अतिक्रमणांबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात येतात, पण पालिकेकडून ठोस कारवाई होत नाही. याबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. देखभाल-दुरुस्तीसाठी अडथळा आणि अपघातासाठी कारणीभूत ठरू शकणारी वीज यंत्रणेजवळील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका आणि महावितरणमध्ये समन्वयाची आवश्यकताही अधोरेखित झाली आहे.
''आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसच्या जवळच महावितरणचा खांब आहे. या खांबावरील तारांच्या आठवड्यातून किमान एकदा तरी ठिणग्या उडतात. ज्या खांबावर तारा आहेत. ते खांबही खुप जुने झाले आहेत. तक्रार केली की दोन-तीन तासांनी महावितरणचे कर्मचारी येऊन वायर जोडून जातात. उच्च अधिकारी आणि प्रशासन यांना अर्ज देऊन झाले. फक्त आश्वासने दिली जातात. कृती मात्र शुन्य आहे. असे नॅनो होम्सचे अध्यक्ष सचिन सिद्धे यांनी सांगितले.''
''नॅनो होम्स सोसायटीच्या जवळ झालेल्या ठिणग्यातून कसलीही जीवित हानी झाली नाही. महावितरणच्या कर्मचा-यांकडून तारा जोडून विजपुरवठा सुरळीत करण्यात आला. असं जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले आहेत.''
पिंपरीत महावितरणच्या रोहित्रातून ठिणग्या उडून विद्युत स्फोटhttps://t.co/CbvSFUjpi9#pimparipic.twitter.com/je9euqfoFQ
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2021