ईडीच्या ऑफीसमधून बोलतोय, प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे पाठवा; उकळले ४ लाख
By रोशन मोरे | Published: September 5, 2023 06:50 PM2023-09-05T18:50:15+5:302023-09-05T18:50:33+5:30
ईडीकडून सुरु असलेली चौकशी क्लिअर करायची असेल तर आम्ही दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवा
पिंपरी : मी ईडीच्या ऑफीसमधून बोलतोय. तैवानवरून तुमच्या नावाने पार्सल पाठवले आहे. त्यात संशयास्पद गोष्टी आहेत. तुमच्या बँक खात्याची ईडीकडून चौकशी चालू आहे. ही चौकशी क्लिअर करायची असेल तर आम्ही दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवा, असे सांगून तरुणाला तब्बल चार लाख ७४ हजार ५३१ रुपये भरायला भाग पाडून फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.४) वाकड, पुणे येथे घडला. या प्रकरणी अक्षय संतोष देशपांडे (वय २७, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय यांच्या संपर्क साधणाऱ्या संशयित शिवम शर्मा या नावाच्या व्यक्तीसह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय यांच्या मोबाईलवर शिवम शर्मा नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने अक्षय यांच्या आधारकार्डचा वापर करून तैवानमध्ये पार्सल पाठवल्याचे असल्याचे सांगून साहेबांशी बोला असे म्हणत दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. त्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यावरून बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे सांगून त्या खात्याची चौकशी सुरु आहे. ती चौकशी क्लिअर करण्यासाठी आम्ही दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवा, असे सांगितले. घाबरलेल्या अक्षय यांनी बँक खात्यावर एक लाख ७४ हजार ५३२ रुपये पाठवले. तसेच आरटीजीएस द्वारे दोन लाख ९९ हजार ९९९ रुपये पाठवले. एकुण चार लाख ७४ हजार ५३१ रुपये अक्षय यांनी संशयितांना पाठवले.