विशेष मुलांनी घातली कॅनडाच्या पर्यटकांना भुरळ
By admin | Published: October 15, 2016 05:42 AM2016-10-15T05:42:15+5:302016-10-15T05:42:15+5:30
वाडा पुनर्वसनच्या सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष मुले सध्या दिवाळीच्या पूर्व तयारीत मग्न असून, ते स्वत: पणत्या हाताने बनवून
कोरेगाव भीमा : येथील वाडा पुनर्वसनच्या सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष मुले सध्या दिवाळीच्या पूर्व तयारीत मग्न असून, ते स्वत: पणत्या हाताने बनवून त्या वेगवेगळ्या रंगांच्या छटांनी रंगवताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहो, असाच संदेश समाजाला देतानाच या वर्षी कॅनडाच्या पर्यटकांनाही भुरळ पाडली असल्याचे शाळाप्रमुख पवन कट्यारमल यांनी सांगितले.
‘सेवाधाम’ विद्यालय नेहमीच निरनिराळे उपक्रम सादर करीत असल्याने परिसरात या विद्यालयाच्या उपक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता असते. चार वर्षांपासून ‘सेवाधाम’ने दिवाळीकरिता ‘पणती’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
शाळेतील १५ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध आकारांच्या, विविध रंगांच्या पहिल्या वर्षी सुमारे ५०० व त्यानंतर प्रत्येक वर्षीही दोन हजार ‘पणत्या’ बनवत असताना ते नाजूकपणे हाताळताना वेगळीच रंगत वाटत होती.
या उपक्रमात देवेंद्र शितोळे, अजय काकडे, संदीप सरवदे, गणेश शिंदे, प्रदीप कुशवाह, रोहित चव्हाण, रमेश सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.(वार्ताहर)