‘त्या’ प्रकरणाच्या तपासाला गती
By admin | Published: March 17, 2016 03:17 AM2016-03-17T03:17:18+5:302016-03-17T03:17:18+5:30
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
चिंचवड : चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
सुरुवातीला त्यांच्या मोबाइलवर आलेले कॉल रेकॉर्ड तपासले. नंतर त्यांच्या नात्यातील जवळच्या लोकांकडे चौकशी केली. त्यांच्यातील कोणीही आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे वेगळ्या दिशेने तपासाला गती दिली. उपनिबंधक कार्यालये तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून अद्याप माहिती मिळाली नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश कांबळे यांनी सांगितले.
नातेवाईक आणि विश्वस्तांकडे चौकशी केली असता, देवमहाराज हे गुडघ्याच्या व्याधीने त्रस्त होते. उजव्या गुडघ्याच्या वाटीचे प्रत्यारोपण केले होते. धार्मिक विधी, पूजेच्या वेळी तासन्तास बसून राहणे अथवा उभे राहणे त्यांना त्रासदायक ठरत होते. त्याचा त्रास होत असल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा, असा निष्कर्ष आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात निघाला आहे. हेच कारण असू शकेल, याबद्दल मात्र पोलिसांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला दोन महिने झाले. त्यांच्या आत्महत्येचे गूढ वाढल्याने अद्यापही वेगवेगळे तर्क-वितर्क काढले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
धर्मादाय आयुक्त व उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळेल, अशी शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)