पिंपरीत मेट्रोचा वेग मंदावला : स्टेशन तयार करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:08 PM2019-05-13T15:08:26+5:302019-05-13T15:10:16+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थंडावले आहे.
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या मेट्रोचा औद्योगिकनगरीतील कामाचा वेग मंदावला आहे. खांब उभारणीच्या कामालाही वेग नाही. तसेच स्टेशन उभारण्याचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि मेट्रो प्रशासन यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ठेकेदाराने हात वर केले आहेत. परिणामी कामाची गती कमी झाली आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
पिंपरी-चिंचवड भागात औद्योगिकीकरण वाढत आहे. शहरात रेल्वे, बस अशा दोनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत. त्यासाठी वाहतूक व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी मेट्रो हा अत्यंत उपयुक्त पर्याय असल्याने भाजपा सरकारने महामेट्रोचे काम सुरू केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सुरू होण्यासाठी महामेट्रोने पाच वर्षांचे ध्येय निश्चित केले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात खांब उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे या वर्षी स्टेशनच्या कामांना गती देण्याचे नियोजन केले होते. त्याचबरोबर ग्रील, फिटिंग, ट्रॅक, वीज आणि सिग्नलचेही काम त्याच वेगाने करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थंडावले आहे.
पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रो नेण्यासाठी विविध सामाजिक संघटना व नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो मार्ग पहिल्या टप्प्यात वाढविण्यासाठी महापालिका, राज्य सरकार व महामेट्रो या सर्व स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मेट्रो धावणार असल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले होते. महापालिकेने हिस्सा देण्याचेही कबूल केले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आलेल्या पत्रानुसार पिंपरी ते निगडी दरम्यानच्या कामाचा डीपीआर तयार केला आहे. त्यापुढील कार्यवाही थंडावली आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालखंडात या प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही.
.....
कामगारांना वेतन नाही
* पिंपरी ते रेजहिल्स हा मार्ग ११.५७ किलोमीटरचा असून महसूल कार्यान्वयाचा कालावधी डिसेंबर २०१९ आहे. पुणे मेट्रोच्या चार मार्गांसाठी सुमारे ११४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे काम वेगाने सुरू होते; मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे काम थंडावले आहे. कंपनी आणि काम करणारे ठेकेदार यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी काम थांबविले आहे. परिणामी सहा महिने वेतन मिळत नसल्याने वल्लभनगर येथील कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केले होते. महापालिकेच्या विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. बदनामी होण्याच्या भीतीने मेट्रोने कामगारांचे थकीत वेतन दिले आहे. सुमारे ३५ लाखांची देणी मेट्रोने दिली आहेत. मार्चमध्येच आचारसंहिता जारी झाल्याने ठेकेदारांना मेट्रोकडून देय रकमा मिळालेल्या नाहीत. त्याचाही परिणाम कामाच्या गतीवर झाला आहे.
..........
दुसऱ्या ठेकेदाराला काम
महापालिका क्षेत्रात पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी ही प्रमुख स्थानके आहेत. सुरुवातीला या स्थानकांचे काम वेगाने सुरू होते. मात्र, कंपनी आणि ठेकेदार यांच्यात वाद झाला. कामाची गती नसल्याने मेट्रोने ठेकेदाराला नोटीस दिली. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन थकविले आहे. काम वेळेवर होत नसल्याने मेट्रोने या कामासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मेट्रोची गती पूर्ववत होईल, असा अंदाज मेट्रोने व्यक्त केला आहे. आचारसंहिता असल्याने यावर प्रतिक्रिया देण्यास मेट्रो प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले आहे.
............
दृष्टिक्षेपात...
* पिंपरी-चिंचवड महापालिका ते हॅरिस ब्रिज (दापोडी) अंतर- सात किलोमीटर.
* सहा मेट्रोस्थानके - दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी (नाशिक फाटा), संत तुकारामनगर आणि महापालिका.
* २४ ऑक्टोबर २०१७ला पहिला खांब बांधला. उंची - १७ मीटर.
*कासारवाडी येथील कास्टिंग गार्डमध्ये पिंपरी ते रेंजहिल्ससाठीचे ३१२३ सेगमेंट तयार.
* रेंजहिलपर्यंत सुमारे ४५० खांब आहेत. दापोडीपर्यंत एकूण खांब सुमारे २१५ असून, फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. खांबांचे काम अपूर्ण आहे.
* मेट्रो मार्गावरील १३५ झाडांचे होणार पुनर्रोपण, तीन झाडांचे प्रायोगिक तत्त्वावर मेट्रो सहयोग केंद्रात पुनर्रोपण करण्याचा उपक्रम आहे.