मौसम मस्ताना! तर्राट वाहनचालक सुसाट
By नारायण बडगुजर | Published: July 13, 2022 11:54 AM2022-07-13T11:54:01+5:302022-07-13T11:56:22+5:30
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत अडचणी...
पिंपरी : काय पाऊस, काय वातावरण अन् काय मौसम, समदं कसं ओक्केमध्ये आहे, असे म्हणत काही तळीरामांकडून तसेच हौशींकडूनही मद्य पार्ट्या होत आहेत. मौसम मस्ताना, फोन कर बसताना, असे म्हणत यात काही शौकीनही सहभागी होत आहेत. यातील काही जण मद्यापान करून वाहन चालिवतात. ब्रिथ ॲनलायझरचा वापर होत नसल्याने अशा मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत अडचणी येत आहेत. परिणामी असे चालक सुसाट आहेत.
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर धडाकेबाज कारवाई होत आहे. कोरोना महामारीमुळे ब्रिथ ॲनलायझरच्या वापरावर निर्बंध होते. त्याचा पुन्हा वापर करावा किंवा नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सध्या वापर होत नाही. ‘आली लहर केला कहर’, असे वागणाऱ्या वाहनचालकांचे त्यामुळे फावले आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून साडेतीन वर्षात २१८५४ मद्यपी वाहनचालकांवर खटले दाखल झाले. यात २०१९ मध्ये या एकाच वर्षात दाखल झालेल्या २०९४३ खटल्यांचा समावेश आहे.
‘ब्रिथ ॲनलायझर’चा वापर बंद
वाहनचालकाने मद्यपान केले आहे किंवा नाही यासाठी ‘ब्रिथ ॲनलायझर’व्दारे तपासणी केली जाते. ‘ब्रिथ ॲनलायझर’मध्ये श्वास सोडून त्यातून अल्कोहोल तपासले जाते. श्वासात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आल्यास संबंधित वाहन चालकाने मद्यपान केले असल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. यात थेट श्वासोच्छवास तपासला जात असल्याने ब्रिथ ॲनलायझरला वाहनचालकांकडून विरोध करण्यात येतो. तसेच संसर्गाची शक्यता असल्याने ब्रिथ ॲनलायझरचा वापर सध्या बंद आहे. तसे आदेशही वाहतूक पोलिसांना दिले होते.
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवकर दाखल केलेल खटले :
महिना - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२
जानेवारी - ०० - २१० - २२ - ००
फेब्रुवारी - २२६ - ४१५ - ०० - ००
मार्च - १९७ - १६६ - ३८ - ०८
एप्रिल - ५७ - ०० - ०१ - ००
मे - ०३ - ०० - ०२ - ००
जून - ०२ - ०० - ०० - ००
जुलै - ०४ - ०० - ०३
ऑगस्ट - ४१६ - ०० - ०२
सप्टेंबर - ४१२ - ०० - ००
आक्टोबर - २५५ - ०० - ००
नोव्हेंबर - २७६ - ०० - ००
डिसेंबर - १०९५ - ४४ - ००
कोरोना महामारीमुळे ब्रिथ ॲनलायझरचा वापर बंद आहे. शासन निर्देशानुसार कार्यवाही होत आहे. वैद्यकीय तपासणी करून मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड