देशासाठी रोज केवळ दहा मिनिटे खर्च करा
By admin | Published: February 6, 2017 06:07 AM2017-02-06T06:07:15+5:302017-02-06T06:07:15+5:30
प्रत्येक देशवासीयाने देशासाठी रोज केवळ दहा मिनिटे खर्च केली तर मानवी शक्तीचा प्रचंड स्रोत निर्माण होवून देश प्रगती पथावर जाऊ शकतो
वाकड : प्रत्येक देशवासीयाने देशासाठी रोज केवळ दहा मिनिटे खर्च केली तर मानवी शक्तीचा प्रचंड स्रोत निर्माण होवून देश प्रगती पथावर जाऊ शकतो. त्यामुळे दैनंदिन धावपळीच्या या जगातून देश आणि समाजहिता साठी नक्की वेळ काढा, असे आवाहन जेष्ठ शास्त्रज्ञ इस्रो संस्थेचे माजी मुख्य संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी वाकड येथे केले.
लायन्स क्लब चिंचवड रॉयल आयोजित लायन्स क्लब आॅफ वाकडची स्थापना येथील क्लब २९ च्या सभागृहात करीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, आपण स्वत:चे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. त्यामुळे आपल्या बरोबरच संपूर्ण जगात शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. तसेच उपग्रहांद्वारे होणाऱ्या दळण-वळणामुळे, शिक्षण क्षेत्रात घडून आलेल्या क्रांतीचा त्यांनी सम्यक आढावा घेतला.
या नूतन क्लबच्या सेवा कार्याची सुरुवात दहशतवाद्यांच्या पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जामखेड येथील वीर पुत्र नितीन दगडू जगताप यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्याकडे सुपूर्त करीत सुरुवात करण्यात आली.
क्लबच्या नवनियुक्त अध्यक्षा सुगंधा जोहर, आणि त्यांच्या टीमला सेवा व्रताची शपथ पूर्व गव्हर्नर श्रीकांत सोनी यांनी दिली. तर डिस्ट्रिक गव्हर्नर चंद्रहास शेट्टी यांनी चार्टर प्रदान केले. अरुण देशमुख यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांसाठी विस्फोट ही मराठवाड्याच्या भाषा शैलीतील कविता सादर केली. डॉ. अनिल परांजपे यांनी शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मोहन कलाटे यांनी सहकार्य केले. तर सूत्रसंचालन स्वाती कोरडे व डॉ. स्वप्नाली धोका यांनी केले. (वार्ताहर)