राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'पुरोगामी' विचारधारेला फाटा; पिंपरीत विरोधी पक्षनेत्याने पदभार स्वीकारताना केली 'श्रद्धेने' पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 01:37 PM2020-09-10T13:37:09+5:302020-09-10T13:55:04+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
पुणे (पिंपरी) : राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष मानला जातो. स्वतः शरद पवार त्या विचारांचे अनुकरण करणारे आहेत. मात्र,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागलेल्या राजू मिसाळ यांनी चक्क पक्षाच्या पुरोगामी विचारसरणीलाच फाटा दिला. विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपल्या कार्यालयातच पूजा केली. आणि यापुढचा धक्कादायक प्रकार म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ यांची बुधवारी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पूजेचा विधी करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी पूजेसाठी आणि त्यांच्या अभिनंदनासाठी पालिकेत हजेरी लावली होती. कोरोनाच्या धर्तीवर लग्न समारंभांना देखील मनुष्य संख्येची मर्यादा आहे. मात्र,अनेक कार्यकर्ते पूजेलाच नव्हे,तर अभिष्टचिंतन करण्यासाठी गटा गटाने येत होते. काही पुष्पगुच्छ घेऊन येत होते तर, काहींनी केक कापून आनंद साजरा केल्याचे चित्र पालिकेत दिसत होते.राष्ट्रवादी पक्ष पुरोगामी मानला जातो. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी पूजा बांधल्याची चर्चा पालिकेमध्ये होती.
पिंपरी -चिंचवड महानगर पालिकेमध्ये बुधवारी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पूजा केली. त्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.शहराला कोरोनापासून मुक्ती द्यावी, या भावनेने एक भक्त म्हणून पूजा घातल्याची प्रतिक्रिया मिसाळ यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.
मिसाळ म्हणाले, पिंपरी चिंचवड मोरया गोसावीचे शहर म्हणून ओळखले जाते. मी गणेश भक्त असल्याने गणेशाची पूजा केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरवासियांना कोरोनापासून मुक्त कर अशी प्रार्थना करण्यासाठी पूजा केली.