एसपीएम स्कूल संघाला जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:20 AM2018-08-29T02:20:10+5:302018-08-29T02:20:39+5:30
शालेय मुली १७ वर्षांखालील टेबल-टेनिस : मिलेनियम नॅशनल स्कूल उपविजेता
पुणे : अनिहा डिसूझा, मेघा काजळे, नूपुर जोशी यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शिक्षण प्रसारक मंडळी इंग्रजी माध्यम प्रशाला (एसपीएम) संघाने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण मंडळ पुणे मनपा आयोजित आंतर शालेय टेबल-टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कूल संघाचा ३-१ गेममध्ये पराभव करून विजेतेपद जिंकले.
सिम्बायोसिस स्कूल प्रभात रोड येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत एसपीएम संघाच्या अनिहा डिसूझाने पहिल्या एकेरीत मिलेनियम नॅशनल स्कूल संघाच्या आस्था जोशीला ११-३, ११-१, दुसऱ्या एकेरीत मेघा काजळेने निधी राहाळकरचा ११-६, ११-८ गुणांनी पराभव केला. तिसºया गेममध्ये मात्र एसपीएमच्या नूपुर जोशीला मिलेनियमच्या मिहिका कुलकर्णीकडून ९-११, ११-८, ५-११ गुणांनी पराभव पत्करावा लागला. नूपुरचा पराभव झाल्यामुळे एसपीएमच्या खेळाडूंना चौथी गेम खेळावी लागली. त्यामध्ये अनिहा डिसुझाने निधी जोशीचा ११-६, ११-२ गुणांनी सहज पराभव करून आपल्या संघाच्या विजेतेपदावर शिक्का मोर्तब केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत एसपीएम संघाने मुक्तांगण संघाचा ३-२ तर मिलेनियम नॅशनल स्कूल संघाने मिलेनियम स्कूलचा ३-१ गेममध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.