Pimpri Chinchwad Bandh: बंदला रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 12:27 PM2023-09-09T12:27:41+5:302023-09-09T12:31:29+5:30

मराठा मोर्चाने पुकारलेल्या पिंपरी चिंचवड शहर बंदमुळे कोणतेही नुकसान होऊ नये या करिता पीएमपीएल प्रशासनाने शहर बस वाहतूक बंद ठेवली होती...

Spontaneous response of citizens of Rawet, Punavale, Valhekarwadi to the bandh | Pimpri Chinchwad Bandh: बंदला रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pimpri Chinchwad Bandh: बंदला रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

- अतुल क्षीरसागर

रावेत (पुणे) : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर  मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी पुकारलेल्या ‘पिंपरी चिंचवड शहर बंदला रावेत, पुनवळे, वाल्हेकरवाडी या उपनगरांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरसतील सर्व बाजारपेठांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदार आणि आस्थापना संचालकांनी सहभाग घेऊन सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते.

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर जालना येथे अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर तसेच सर्व संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला लोकांचा प्रतिसाद दिसून आला. शांततेच्या व संवेदनशील मार्गाने पुकारण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड शहर बंदला पाठींबा म्हणून रावेत, पुनवळे,वाल्हेकरवाडी परिसरात पूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

अत्यावश्यक सेवा वगळता रावेत, पुनवळे, वाल्हेकरवाडी उपनगरात पूर्णपणे सर्व व्यावसायिकांनी आपापले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी वाल्हेकरवाडी, रावेत परिसरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

रावेत येथील धर्मराज चौकातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद
रावेत येथील धर्मराज चौकातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

अत्यावश्यक सेवा सुरू...

रावेत, पुनवळे आणि वाल्हेकरवाडी परिसरात मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदला सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदमधून हॉस्पिटल, मेडिकल दुकाने आदी अत्यावश्यक सेवा वगळल्याने परिसरातील सर्व हॉस्पिटल आणि मेडिकल दुकाने सुरळीत सुरू होती.

पीएमपीएल बस सेवा बंद-

मराठा मोर्चाने पुकारलेल्या पिंपरी चिंचवड शहर बंदमुळे कोणतेही नुकसान होऊ नये या करिता पीएमपीएल प्रशासनाने शहर बस वाहतूक बंद ठेवली होती. याचा फटका कामावर जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना बसला तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी बस नसल्याने घरी परत फिरावे लागले.

रिक्षा चालकांची मनमानी-

रावेत, पुनवळे, वाल्हेकर वाडी आदी परिसरातील चाकरमानी कामावर जाण्यासाठी शहर वाहतूक बस सेवा बंद असल्याने रिक्षाच्या माध्यमातून कामावर वेळेत पोहचण्यासाठी लगबग करीत असल्याचे विविध ठिकाणी दिसून आले रिक्षा चालक मात्र बंदचा फायदा उठवीत प्रवाशांकडून अधिकचे भाडे आकारत असल्याचे निदर्शनास आले.

रावेत प्राधिकरण भागातील बंद असलेली दुकाने
रावेत प्राधिकरण भागातील बंद असलेली दुकाने


पोलिसांचा चोख बंदोबस्त...

आंदोलनादरम्यान रावेत, पुनवळे, वाल्हेकर वाडी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रावेत आणि चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, रावेत येथील धर्मराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोंडवे कॉर्नर, बीआरटी मुख्य चौक, शिंदे वस्ती चौक, बीआरटी मार्ग आदी ठिकाणी पोलीस तैनात केले होते.

रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपरी चिंचवड बंदच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत पार पडावा याकरिता पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- रवींद्र पन्हाळे (पोलीस उपनिरीक्षक, रावेत पोलीस स्टेशन)

Web Title: Spontaneous response of citizens of Rawet, Punavale, Valhekarwadi to the bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.