शहरात विजांसह अवकाळी पावसाचा शिडकावा
By admin | Published: May 13, 2017 04:46 AM2017-05-13T04:46:47+5:302017-05-13T04:46:47+5:30
पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात शुक्रवारी विजांसह पावसाचा शिडकावा झाला. यामुळे हवेत गारवा पसरल्याने उन्हाच्या कडाक्यापासून हैराण झालेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात शुक्रवारी विजांसह पावसाचा शिडकावा झाला. यामुळे हवेत गारवा पसरल्याने उन्हाच्या कडाक्यापासून हैराण झालेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला.
गेल्या महिनाभरात उन्हाच्या कडाक्याने अंगाची अक्षरश: लाही-लाही झाली. शहराचे तापमान ४१ अंशावर पोहोचले होते. यामुळे दुपारच्या वेळी अनेक जण घराबाहेर पडणेदेखील टाळत होेते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास झालेल्या पावसामुळे हवेत गारवा पसरला. शुक्रवारी दिवसभर कडक उन्हासह ढगाळ वातावरणही दिसून येत होते. मात्र, सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. विजाही चमकू लागल्या. त्यानंतर सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची धांदल उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजण्याशिवाय पर्याय नव्हता. तर काहींनी रस्त्याच्या कडेला अडोसा शोधून पावसात भिजणे टाळल्याचे दिसून आले. दरम्यान, कडक उन्हानंतर पडलेल्या पावसाचा बच्चे कंपनीने आनंद लुटला. शहराच्या काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. यासह पहिलाच पाऊस असल्याने काही रस्तेही निसरडे झाले. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.