"श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:11 PM2022-07-20T12:11:41+5:302022-07-20T12:11:56+5:30

मावळ लोकसभेचे खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती

Srirang Barane departure does not make any difference to us is the opinion of the Shiv Sena workers of Maval | "श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत

"श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत

Next

पिंपरी : शिवसेनाएकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची यावरून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आता शिवसेना आमदारांच्या नंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, बारणे यांच्यासोबत कोणताही शिवसेना पदाधिकारी गेलेला नाही. त्यामुळे बारणे यांच्या जाण्याने शहर संघटनात काही फरक पडणार नाही, असे मत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

मावळ लोकसभेचे खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. मात्र, बारणे यांच्याकडून याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आले नव्हते. अखेर मंगळवारी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला.
श्रीरंग बारणे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी ते म्हणाले, खासदार बारणे यांचा शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. शिवसैनिक त्यांच्या या निर्णयाशी सहमत नाहीत. शहरातील शिवसेना संघटन कायम असून, आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ असणारे शिवसैनिक आहोत. खासदार, आमदार हे आले गेले तरी आम्हांला फरक पडत नाही. कट्टर शिवसैनिक हा कायम ठाकरेंसोबतच राहणार आहे.

खासदार बारणेंवर दबाव?

दोन ते तीन दिवसांपूर्वी बारणे यांनी आपल्या जवळच्या काही नगसेवकांशी फोनद्वारे संपर्क साधला होता. आपण शिंदे गटात जावे, यासाठी आपल्यावर प्रचंड दबाव असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, तु्म्ही असा निर्णय घेऊ नका. शिवसेनेसोबत कायम रहा, असे शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. याविषयी खासदार बारणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्याचा कॉल नॉट रिचेबल होता.

रेखा दर्शले यांचा बोलण्यास नकार

ताथवडेतील माजी नगरसेविका रेखा दर्शले या खासदार बारणे गटातील म्हणून ओळखल्या जातात. बारणे यांनी बंड केले. त्याविषयी त्यांच्याशी संपर्क केला, असताना आपण कुठे जायचे, या संदर्भात विचार केला नाही, असे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

एका अर्थाने ते गेले ते बरेच झाले

खासदार बारणे यांच्या जाण्याने पक्षसंघटनेला फरक पडत नाही. विद्यमान आमदारांना डावलून त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. ठरावीक लोकांना विश्वासात घेऊन ते काम करीत होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्येदेखील त्यांच्याविषयी असंतोषच होता. एका अर्थाने ते गेले ते बरेच झाले, असे शिवसैनिक म्हणत आहेत. - ॲड. सचिन भोसले, शहर प्रमुख, शिवसेना

शहरातील पक्षसंघटना मजबूत

आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. खासदार बारणे यांच्या सोबत त्यांचे समर्थक असलेले पाच ते सहा कार्यकर्ते वगळता कोणीही जाणार नाही. शहरातील पक्षसंघटना मजबूत असून, त्यांच्या जाण्याने काहीच फरक पडणार नाही. - गौतम चाबुकस्वार, माजी आमदार

Web Title: Srirang Barane departure does not make any difference to us is the opinion of the Shiv Sena workers of Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.