मावळ शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार होणार - उदय सामंत
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: March 14, 2024 07:21 PM2024-03-14T19:21:55+5:302024-03-14T19:22:56+5:30
२०२४ सगळ्या मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विजयी होणार असून मोदीच पंतप्रधान असतील ही काळया दगडावरची रेष आहे
पिंपरी : महायुतीमधील शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील. त्यांचे सर्व निर्णय आम्हाला मान्य असतील. दीड महिन्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, असे सांगत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. चिंचवड येथे उद्योगमंत्री उदय सामंत हे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सामंत म्हणाले, शिवतारे यांच्या बाबत निर्णय वर्षा बंगल्यावर होईल. कोणी-कुठेही गेले तरीही २०२४ सगळ्या मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विजयी होणार आहेत. त्यामुळे मोदीच पंतप्रधान असतील ही काळया दगडावरची रेष आहे. मी स्वत: खासदारकीसाठी इच्छुक नाही. परंतु, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेची होती ती शिवसेनेला मिळावी, अशी अपेक्षा आहे. असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवना,इंद्रायणीचा डीपीआर तयार, निविदा लवकरच
सामंत म्हणाले, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदुषणाबद्दल बारणे यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत. यापूर्वी अनेकजण येऊन गेले त्यांचा दृष्टीकोन काय होता माहित नाही, पण बारणे यांनी त्यासाठी सतत पाठपुरावा केला. चार महिन्यांपूर्वीच या विषयावर महापालिकेत बैठक घेतली. आम्ही या प्रकल्पासाठी तीन वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्च करतोय. आता त्या कामाचा डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्याचे टेंडर होईल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.