SSC RESULT 2019- दहावीच्या परीक्षेत पिंपरीच्या पोरी हुश्शार..!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 06:59 PM2019-06-08T18:59:34+5:302019-06-08T19:08:08+5:30
पिंपरी-चिंचवडचा निकाल ८६.४९ टक्के लागला असून त्यात मुलींचे प्रमाण ९०.९४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ८२.६२ टक्के इतके आहे...
शतकवीर शाळांची संख्याही घटली
पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, हवेली, खेड, मावळ व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल ८६.४९ टक्के लागला असून त्यात मुलींचे प्रमाण ९०.९४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ८२.६२ टक्के इतके आहे. गतवर्षी ९४.३३ टक्के निकाल लागला होता. त्यात ७.८४ टक्यांची घट झालीआहे. त्यामुळे उद्योगनगरीच्या पोरी हुश्शार असल्याचे सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला. १८७ शाळांमधून १९ हजार १७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल असल्याने सकाळपासूनच मुलांमध्ये उत्सुकता होती. बारा वाजल्यापासूनच मुले सायबर कॅफेमध्ये जागा धरून बसली होती. तर काही मुले मोबाईलवर निकालाची वाट पाहत होती. दुपारी एक वाजताच संकेतस्थळावर निकाल खुला करण्यात आला. शहर, खेड, मावळ आणि मुळशी, हवेलीतील सुमारे ५१२ शाळांचा निकाल जाहीर झाला. निकाल लागताच मुलींनी जल्लोषही केला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटले. एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातील १९ हजार १७६ विद्यार्थी बसले होते. त्यात मुले १० हजार २६२ असून, मुलींची संख्या ८९१४ आहे. त्यापैकी ८ हजार ४१६ मुले, तर ८,०६१ मुली असे एकूण १६ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची टक्केवारी ९०.९४ असून, मुलींची टक्केवारी ८२.६२ आहे. या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही वाढला आहे. दरम्यान, विद्यार्थी-पालकांना असलेली निकालाची उत्सुकता संपली असून, आता ठरविलेल्या शाखेत प्रवेश घ्यायचा यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मावळचा निकाल ८३.४० टक्के, तर मुळशीचा निकाल ८२.५८ टक्के, हवेलीचा निकाल ८३.५४ टक्के लागला आहे. खेडचा निकाल ८५.४५ टक्के लागला आहे. मावळात मुलींचा निकाल ८९.०५ तर मुळशीत ८७.०५ टक्के लागला आहे. खेडमध्ये ९१.१८ टक्के लागला आहे.
शतकवीर शाळांची संख्या घटली.
पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड आणि मुळशी तालुक्यातील शतकवीर शाळांची संख्या कमी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ४५ हून अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गेल्यावर्षी ७६ शाळांचा निकाल लागला होता. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे. मराठी शाळांचा निकाल कमी लागला आहे. इंग्रजी शाळांतील टक्केवारी वाढतच आहे. त्या तुलनेत मराठी शाळांची टक्केवारी कमी होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
.............................................
एकूण शाळा ५१२
पिंपरी-चिंचवड-१८७
हवेली -१२५
मावळ-७६
मुळशी-४६
खेड -७८
..............
मुलींचे प्रमाण ९०.९४ टक्के, मुलांचे प्रमाण ८२.६२ टक्के