SSC Result 2024: कचरावेचक कुटुंबातील आर्याची झेप, आई आणि आजीची नातीसाठी जिद्द
By विश्वास मोरे | Published: May 27, 2024 08:02 PM2024-05-27T20:02:19+5:302024-05-27T20:05:01+5:30
आर्याचे प्राथमिक शिक्षण गीतामाता शाळेमधून झाले. तर दहावीची परीक्षा चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून दिली....
पिंपरी : वडिलांचे निधन झाले, त्यामुळे आजी आणि आईने तिच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारली. कचरावेचक आजीच्या नातीने दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. आर्या धनराज चांदणे असे तिचे नाव आहे. चिंचवड आनंदनगरमधील पानसरे चौक येथे आर्या धनराज चांदणे ही वास्तव्यास आहे. तिची आजी शांता गोविंद चांदणे या अनेक वर्षांपासून कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संस्थेच्या माध्यमातून कचरावेचक म्हणून काम करतात.
आर्याचे प्राथमिक शिक्षण गीतामाता शाळेमधून झाले. तर दहावीची परीक्षा चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून दिली. तिने दहावीच्या परीक्षेत ७४.४ टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे. आर्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आजी शांताबाई यांनी घेतली. त्यांनी कचरा गोळा करण्याचे काम करून त्यातून मिळणारी रक्कम यातून शिक्षणाचा खर्च केला होता. तसेच आजी आणि आर्याची आई पिंकी या दोघी धुणीभांडी करून घराचा गाडा चालवित आहेत. तर आर्याला तीन भावंडे आहेत.
आर्या म्हणाली, ‘आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कुठलेही क्लास लावले नव्हते. घरीच अभ्यास केला. यश संपादन केले आहे. त्यामुळे आजी व आईला अतिशय आनंद झाला. भविष्यात उच्च शिक्षण घ्यायचे आहे. मोठे व्हायचे आहे. कुटुंबास मदत करायची आहे.’
आजी शांता गोविंद चांदणे म्हणाल्या, ‘आमचे सर्वसामान्य कुटुंब. आर्याच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तिची आई आणि माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. तिने अभ्यासासाठी कष्ट घेतले. संघटनेची मिळालेली शैक्षणिक मदत आर्याच्या शिक्षणासाठी कामा आली. आम्ही शिकलो नाही पण नातीला शिकवायचे आहे. मोठे करायचे आहे.’