एसटी महामंडळाच्या वायफाय सुविधेचा बोजवारा, लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही सेवा, प्रवाशांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:46 AM2017-08-21T03:46:58+5:302017-08-21T03:46:58+5:30
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.
पिंपळे गुरव : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात दिवस-रात्र हजारो बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करताना मोबाइलवर आनंद मिळावा म्हणून ही सुविधा सुरू केली. बसमध्ये वायफाय मशिन असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे बुजगावणे म्हणून पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य महामार्गावर एसटी महामंडळाच्या हजारो बस धावतात.
लांब पल्ल्यांच्या बसमध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने ही वायफाय सुविधा बसमध्ये सुरू करण्यात आली. बहुतांश
बसमध्ये वायफाय मशिन आहे, पण त्या बंद अवस्थेत आहेत. याबाबत चालक व वाहकांना विचारले असता, या मशिन बसमध्ये बसविल्यापासून बंदच आहेत. वायफाय सुविधा सुरू झालीच नाही. प्रवाशांना हे मशिन फक्त शो पीस म्हणून पाहावे लागत आहे.
एसटीमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असेल या अपेक्षेने प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र, ऐनवेळी वायफाय बंद असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये निराशा पसरते. तरी एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन एसटीमध्ये ही सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
एसटीचे घोषवाक्य
ठरतेय निरर्थक
शासनाच्या वतीने अनेक योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. लाभधारकांना प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ मिळतो किंवा नाही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. एसटीमध्ये प्रवास, करमणूक हमखास हे घोषवाक्य निरर्थक आहे. यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारामध्ये ५८ बस आहेत. त्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा सहा महिन्यांपासून सुरू आहे. एखाद्या बसमधील वायफाय मशिन बंद पडल्यानंतर कर्मचारी लगेच दुरुस्त करून घेतात. ही प्रवाशांसाठीची वायफाय सुविधा प्रभावीपणे राबविणार आहे.
- अनिल भिसे,
आगार व्यवस्थापक, वल्लभनगर
शिवाजीनगर आगारातील तीन बस शालेय सहलीसाठी आणल्या होत्या. त्या तीनही बसमध्ये वायफाय सुविधा मशिन होत्या. मात्र या मशिन बंद अवस्थेत होत्या. ही सुविधा पूर्णत: फसवी असल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पीएमपीप्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकाºयांची नितांत आवश्यकता आहे.
- बिपीन बनकर, शिक्षक, औंध