एसटीने उत्पन्नाचे नवे साधन शोधले, मालवाहतुकीतून मिळवला ५६ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 10:31 AM2021-05-21T10:31:28+5:302021-05-21T10:31:35+5:30
प्रवासी वाहतूक उत्पन्नाचा मार्ग खुंटला
पिंपरी: कोरोनामुळे प्रवासी वाहतूक उत्पन्नाचा मार्ग खुंटला आहे. या काळात माल वाहतुकीवर लक्ष केंद्रित करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गेले वर्षभर प्रवासी वाहतूक फारशी झाली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून तर, सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंदच आहे. या काळात माल वाहतूक करून एसटीने उत्पन्नाचे अन्य साधन शोधले आहे.
महाकार्गो अंतर्गत माल वाहतूक करण्यास २१ मे २०२० पासून सुरुवात करण्यात आली. वर्षभरात १ कोटी चाळीस लाख किलोमीटरचा टप्पा पार पाडत एसटीने मालवाहतूक क्षेत्रातही एक मैलाचा दगड पार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विभाग नियंत्रकामार्फत माल वाहतुकीचे नियोजन केले जाते. त्यावर एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून नियोजन केले जाते. एसटीच्या ताफ्यात १ हजार १५० ट्रक आहेत. या माध्यमातून वाहतुकीच्या ९५ हजार फेऱ्या झाल्या असून, सात लाख टन मालाची वाहतूक केली आहे.
रास्त धान्य दुकानांचे धान्य, बियाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, कोकणातील आंबा देखील विविध ठिकाणी पोहचवला आहे. त्याच बरोबर काही सीमेंट कंपन्याही एसटीच्या ट्रकचा, माल वाहतुकीसाठी वापर करीत आहेत. पुढील वर्षभरात माल वाहतुकीतून शंभर कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचा मानस असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विविध शासकीय विभागामार्फत करण्यात येणाऱ्या माल वाहतुकीपैकी २५ टक्के वाहतूक एसटीच्या सेवेद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा एसटीच्या माल वाहतूक सेवेला होईल.