दोन दिवसांच्या संपानंतर एसटी आली पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:28 AM2018-06-11T06:28:38+5:302018-06-11T06:28:38+5:30
दोन दिवसांच्या संपानंतर एसटी पूर्वपदावर आली. सेवा सुरू झाल्यानंतर १५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबई-पुणे मार्गासह उर्वरित मार्गावर मोठी गर्दी होती.
मुंबई - दोन दिवसांच्या संपानंतर एसटी पूर्वपदावर आली. सेवा सुरू झाल्यानंतर १५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मुंबई-पुणे मार्गासह उर्वरित मार्गावर मोठी गर्दी होती. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे रविवारी घरी परतणाºया प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
१५ जूनपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने चाकरमान्यांची मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी झाली होती. मुंबई-पुणे मार्गासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण येथून मुंबईकडे येणाºया बहुतांश एसटी फुल्ल भरून धावत होत्या. रविवारी मुंबई-उपनगरात पावसाने दांडी मारल्यामुळे प्रवास सुखरूप झाल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत होती. संपानंतर राज्यातील सर्व मार्गांवर एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. दहावीचा निकाल लागल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी परतीच्या प्रवासाला चाकरमान्यांनी सुरुवात केली.
महामंडळातील हजारो कर्मचाºयांनी गुरुवार मध्यरात्रीपासून उत्स्फूर्तपणे संप पुकारला. शुक्रवार-शनिवारी संपामुळे राज्यातील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी रात्री उशिरा परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि एसटीतील सर्व संघटनांनी एकत्र बैठक घेतली. बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा संप मागे घेण्याचे आवाहन सर्व संघटना आणि मंत्री रावते यांनी कर्मचाºयांना केले.
मंत्री रावते आणि एसटीतील संघटनांच्या अहंकारामुळे राज्यातील ७० लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असल्याची चर्चा महामंडळातील अधिकाºयांमध्ये रंगत आहे. दोन दिवसांच्या संपानंतर शनिवारी रात्री उशिरा सुटणाºया एसटी सेवा मार्गस्थ झाल्या. रविवार सकाळच्या सत्रात एसटी
सेवा पूर्वपदावर आली होती. राज्यातून मुंबईकडे येणाºया एसटीमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.
आरक्षणाचे पैसे परत!
संपकाळात आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचे पैसे परत करण्यात येण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती महामंडळाने दिली. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.